अलिबाग : जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकमताने काम करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. ज्या यंत्रणांचा निधी खर्च न होता शासनास समर्पित होईल, अशा यंत्रणांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चव्हाण होते. ते म्हणाले, २०१८-१९ साठी रायगड जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत १८९ कोटी १७ लाख रु पये, विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ९४ लाख रु पये व आदिवासी उपयोजनेसाठी ५५ कोटी ९५ लाख असा एकूण २७० कोटीरु पयांचा आराखडा आहे. निधी खर्च करून जिल्ह्यातील विकासकामे करावयाची आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक कालावधी लक्षात घेता खूप कमी कालावधी उपलब्ध होईल, त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकानिहायकचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात, तसेच नव्याने निर्माण होत असलेल्या नागरी वसाहतींमधील सांडपाण्याच्या प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाºयांची समिती पाहणी करून अभ्यास करतील. त्यानंतर या बाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडित पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, जि.प. उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी केले.
जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:32 PM