अलिबाग : जिल्ह्यात सर्वत्र थर्टीफर्स्टच्या सेलीब्रेशनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विदेशी मद्याच्या विक्री करात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाल्याने तळीरामांच्या सेलीब्रेशनचे बजेट वाढणार आहे. या कालावधीमध्ये सुमारे तीन लाख बल्क लिटर मद्य विकले जाणार आहे. त्या माध्यमातून महिन्याच्या उद्दिष्टाच्या सुमारे ६० टक्के अधिक उद्दिष्ट प्राप्त होणार असल्याचा अंदाज रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये ७२५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठायचे आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ३८० कोटी १० लाख ८८ हजार ९११ रुपयांचा महसूल विविध हेडच्या माध्यमातून गोळा केला असून, ५५ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठले आहे.विदेशी मद्यावर सुमारे १० टक्के विक्रीकर वाढला आहे. त्यामुळे विदेशी मद्याचे सेलीब्रेशन महागात पडणार आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पाच लाख ३५ हजार ९५५ बल्क लिटर विदेशी मद्य विकले गेले होते. यंदा त्यामध्ये सुमारे पाच टक्के घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सहा लाख ६९ हजार ४२ बल्क लिटर देशी दारू विकली गेली होती. त्यामध्ये १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, तर १२ लाख ५५ हजार ६५२ बल्क लिटर बीअर तळीरामांनी रिचवली आहे.यंदा सुमारे सहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत एकूणच मद्याची विक्री वाढणार असून, डिसेंबरअखेर महिन्याच्या उद्दिष्टाच्या ६० टक्के अधिक उद्दिष्ट प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)बनावट दारू विकणाऱ्यांपासून सावध राहावे. सरकारने परवाना दिलेल्या दुकानातूनच मद्याची खरेदी करावी. अवैध धद्यांवर आमची करडी नजर राहणार आहे.- नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड
तळीरामांच्या सेलीब्रेशनचे बजेट वाढणार
By admin | Published: December 29, 2015 12:19 AM