उदय कळस
म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोळवट, भापट ही गावे वसलेली आहेत. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडेदेखील रस्ता दुरुस्त करण्यासाठी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गावअंतर्गत सहा गावांनी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगड-मातीचा आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखी किती वर्षे असेच चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या. संबंधित राजकीय पक्षांतर्फे शाब्दिक, लेखी आश्वासन देण्यात आले; परंतु कोणीही शब्द, आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आजही या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे.तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातीवणे आणि कोळवट ही गावे तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात असून, या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.वाहनचालक त्रस्त, प्रवाशांची गैरसोयपावसाळ्यात महामंडळाची एसटी बसदेखील बंद केली जाते. या वेळी खाजगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. कारण या रस्त्याची अवस्था अतिशक बिकट झाली आहे. काही खाजगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात; मात्र ते सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दिवसेंदिवस हा रस्ता जणू डोंगरातून गावात जाणारी पायवाट झाल्याचे दिसत आहे.भापट-कोळवट रस्त्यासंदर्भात अनेक वेळा खासदारांना निवेदन दिले आहे. कोलवट रस्त्यावर जनसामान्यांची गैरसोय होत आहे. या भागातील लोकांना दवाखाना, बाजार करण्यासाठी म्हसळ्यात जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना म्हसळ्यात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. खराब रस्त्यांमुळे महामंडळाची एसटी पोहोचणे खूप त्रासदायक होत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे पालकमंत्री तसेच खासदारांनी लक्ष द्यावे, अशीच आमची मागणी आहे.- रवींद्र दाजी कुवारे,ग्रामपंचायत सदस्य,कोळवटआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून, जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. कारण निवडणुका आल्या की याच रस्त्याने राजकीय पक्ष आश्वासने देण्यासाठी धावत येत असतात. परंतु बाकी इतर दिवस वगळता या रस्त्याकडे कुठलाही राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे.- शिराज नजीर,ग्रामस्थ