बिरवाडी : महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळली असून, ही दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरची नार्को टेस्ट करून ही इमारत उभारण्यासाठी त्याने कुणा-कुणाला टक्केवारीने पैसे दिले, याची सखोल चौकशी करावी. त्याचप्रमाणे, तत्कालीन मुख्याधिकारी झिंजाड व नगर अभियंता दिघे महाराष्ट्रात कुठेही कार्यरत असले, तरी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी दक्षिण रायगडचे युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी महाडमधील पत्रकार परिषदेत केली.या दुर्घटनेत जे रहिवासी बेघर झाले आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाड नगरपरिषदेने प्रत्येकी २ लाखांची मदत करावी. महाड शहरात बिल्डिंगला परवानगी देताना टक्केवारी द्यावी लागते, अथवा पार्टनरशिप द्यावी लागते, असा आरोप करत, गतवर्षी शहरातील अनधिकृत शेड व टपऱ्यांवर कारवाई करणाºया नगरपालिकेने शहारातील १० ते १५ अनधिकृत व धोकादायक इमारतींवर पालिकेने कारवाई का केली नाही, असा सवाल गोगावले यांनी केला. शहरासह ग्रामीण भागातील सर्व धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करावे व त्याचा खर्च पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलावा. त्याचप्रमाणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था पालिकेने करावी, अशी मागणी गोगावले यांनी केली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन पावले महाड नपाचे विरोधी पक्षनेते चेतन पोटफोडे नगरसेवक सुनील अगरवाल आदी उपस्थित होते.महाड शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींवर कारवाईची मागणी सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात आली होती, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
महाड दुर्घटनेतील दोषी बिल्डरची नार्को टेस्ट करावी, पत्रकार परिषदेत विकास गोगावलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 12:59 AM