दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील नडगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम तोडत असताना इमारत तोडकाम करणाऱ्या जेसीबीवर सोमवारी कोसळली. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जेसीबी चालकाला तब्बल तासाभराने बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समशेर अन्सारी असे या गंभीररीत्या जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नडगावतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीची इमारत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जात असल्याने, ग्रामपंचायत कार्यालयाने सदर इमारत तोडण्यासाठी निविदा काढली होती. त्यानुसार, इमारत तोडायला संबंधित ठेकेदाराने सुरुवात केली होती. इमारतीचा बहुतांश भाग तोडून झाल्यानंतर सोमवारी दुपारी समोरील भाग तोडत असताना जिन्याचा भाग जेसीबी यंत्रावर कोसळला. जेसीबीच्या केबिनचा भाग चेपला गेल्याने आतील चालक गंभीर जखमी झाला. चालकाचा अडकलेला पाय सोडविण्यासाठी तब्बल एक तास लागला. गंभीररीत्या जखमी झालेल्या जेसीबी चालकाला बाहेर काढण्यासाठी महाड औद्योगिक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. चालकाला बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या वेळी सुदैवाने अन्य कोणीही या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
सुरक्षेचे नियम बसविले धाब्यावर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात नडगाव ग्रामपंचायत इमारत बाधित होत असल्याने, नवीन इमारतीचे अन्य ठिकाणी बांधकाम केले जाणार आहे. तत्पूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने १ लाख ७५ हजार रुपयांची एक निविदा काढली होती.
ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्षत्यानुसार, हे काम ठेकेदाराने घेतले होते. हे काम करत असताना सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेच्या वेळी सुदैवाने अन्य कोणीही या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.