आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:58 PM2018-11-18T23:58:50+5:302018-11-18T23:59:07+5:30
महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही.
- संदीप जाधव
महाड : महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही. सरकारी अनास्थेमुळे आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेकरिताही या परिसरातील २० हजार नागरिकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. अद्ययावत इमारतीअभावी उपकेंद्राच्या लहान जागेत रु ग्णांची आरोग्यसेवा दिली जात आहे.
ग्रामस्थांना आरोग्यसेवा देणे व राष्टÑीय आरोग्यविषयक योजना गाववाड्यांवर पोहचविण्याचे महत्त्वाचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रांतून होते. महाड तालुक्यातील वरंध येथे जिल्हा परिषदेने १९९९ साली प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. त्यानंतर २६ जानेवारी २००९ ला तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांनी नव्या इमारतीचे भूमिपूजन केले. त्यानंतर सुरू झालेल्या या केंद्राचे नष्टचक्र अद्यापही संपलेले नाही. प्रारंभी केंद्राला इमारत नव्हती. अशावेळी भाड्याच्या जागेत व सध्या उपकेंद्राच्या अपुऱ्या जागेत आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू आहे. सुरुवातीला या इमारतीसाठी ६५ लाख खर्च येणार होता. परंतु ठेकेदाराला अपघात झाल्याने २०१२ मध्ये या इमारतीचा ठेका रद्द केला, तोपर्यंत या कामावर ३८ लाख रुपये खर्च झाले होते. आठ वर्षे इमारतीचे काम ठप्प झाले होते. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कामाला नव्याने वाढीव दराने मंजुरी मिळाली. आता इमारत, कंपाउंड, कमानी असे चांगल्या दर्जाचे काम पूर्ण झाले आहे.
परंतु आतील वीज सुविधा व पुरवठा ही कामे बाकी आहेत. यासाठी आठ लाखांच्या निविदा निघाल्या आहेत. हे काम पूर्ण होत नाही तोपर्र्यंत केंद्राचा वापरासाठी सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१८ गावे, ४४ वाड्यांना सेवा
आरोग्य केंद्रातून वरंध विभागातील १८ गावे, ४४ वाड्यांतील सुमारे २० हजार लोकांना आरोग्यसेवा दिली जाते. नव्या इमारतीत वॉर्डरु म, तपासणी कक्ष, शस्त्रक्रि या कक्ष, प्रशासकीय इमारत अशा सुविधा आहेत. इमारतीसाठी १ कोटी ३५ लाख खर्च करण्यात आला आहे.
वरंध प्रा.आ.केंद्राच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ वीज सुविधेची कामे पूर्ण होणे बाकी असून ती काही महिन्यात पूर्ण होतील.
- एस.एस.शिर्के, शाखा अभियंता जि.प.बांधकाम विभाग महाड