अलिबाग : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये बांधकाम उद्योग ही सुटलेला नाही. सिमेंट, वाळू, वीट व स्टील आदी साहित्याच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चही वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे बजेट पुरते कोलमडले आहे.२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने सुरू असलेले, अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. टाळेबंदीपूर्वी अनेक प्रकल्प प्रस्तावित होते. रायगड जिल्ह्यात विकासकांनी गृहप्रकल्पाची घोषणा करून, त्यावेळच्या दरानुसार नोंदणी केली होती, परंतु कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत त्याच दराने घराची विक्री करणे विकासकांना शक्य नसल्याने, अनेकांनी ग्राहकांकडे जास्त रकमेची मागणी केल्याची उदाहरणे आहेत. टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद होती. त्यामुळे इतर राज्यांतून पुरेसा कच्चा माल उपलब्ध झाला नाही. सरकारची परवानगी नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून दगडखाणी बंद आहेत. त्यामुळे खडी, गिट्टी, दगडी, गोठळी, रेजगा आदी पुरवठाही कमी झाला आहे. यातच किमती वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी कच्च्या मालाचा मर्यादित साठा करून ठेवला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायिक संकटात सापडले आहेत.
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?संचारबंदी व टाळेबंदीत सर्वच व्यवसाय बंद होते. वाहतूक यंत्रणाही बंद होत्या. या काळात मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने बांधकाम साहित्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. आता अनलॉकमध्येही पुरेसे मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन घटले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात मजूर मिळत नव्हते. याचा सर्वात जास्त परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे वाळू, सिमेंट, वीट, ग्रीटचे दर वाढले आहेत. कच्या मालाला मागणी असली, तरी साठा मर्यादित आहे, तर पुढील काही महिने अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.- रणजीत म्हात्रे, बांधकाम साहित्यविक्रेता