राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, रायगड : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य यंत्रणा आजच्या घडीला सक्षम नाही. ज्या आंतररुग्ण इमारतीत शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात, ती पूर्णपणे जीर्ण झाली असून एकवेळ खात्रीशीर उपचार मिळेल की नाही, याची शाश्वती नसली तरी इमारतीचा कोणता ना कोणता कोपरा, भाग कोसळून पडेल, याबाबतची खात्री देता येईल, अशी परिस्थिती आहे. उपचारासाठी येणारे भीतीच्या सावटाखाली वावरत असतात.
सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत जुनी व खराब झाल्याने अनेक ठिकाणाहून त्याचे तुकडे पडत आहेत. दोन वर्षांपासून अनेक कक्षातील स्लॅब, सज्जा तुटून पडला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून अशा दुर्घटनेतून प्रसूती कक्ष, अतिदक्षता या विभागात उपचार घेत असलेले रुग्ण बचावले आहेत. या इमारतीच्या दुरुस्ती काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रडतखडत सुरू आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गरोदर माता प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. प्रसूती कक्षाची क्षमता ही ७५ असताना ९० हून अधिक गरोदर मातांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या प्राथमिक उपचार होत आहेत. मात्र, गंभीर आजारावर होणाऱ्या शस्त्रक्रिया याठिकाणी होत नाही आहेत. बालकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध नसल्याने उपचार करण्यास अडचणी येत आहेत.
अनेक उपकरणे खराब व कालबाह्य
रुग्णालयात क्ष किरण कक्ष आहे. यामध्ये सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एक्सरे, मेमोग्राफी, डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या मशिनीही आता जीर्ण होऊ लागल्याने अनेक वेळा बंद पडत असतात. त्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने कर्मचारी यांच्यावर भिस्त आहे. पूर्ण बांधकाम नव्याने करण्याची गरज असताना शासनाकडून तात्पुरती दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत.