बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसात; सहा वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:54 AM2021-01-29T02:54:56+5:302021-01-29T02:55:12+5:30
परहूर पाडा येथील घटना
अलिबाग: तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसातील सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत घुसली. त्याचवेळी बाजूला उभ्या असणाऱ्या सहा वर्षीय मुलाच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने तो थोडक्यात बचावला आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा कार्ले गावामध्ये अशा थरारक घटना घडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावामध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच उपाययोजना करून, अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. हे मैदान कुलाबा जिल्हा अस्तित्वात असतानाच पोलीस विभागाने निर्माण केले होते. सध्या याच सराव मैदानावर राज्यातील पोलीस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांचा गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेली गोळी कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या घरातील परसात असलेल्या पाण्याच्या टाकीत घुसली. बंदुकीतून सुटलेली गोळी पाटील यांचा सहा वर्षीय मुलगा आद्य याच्या अगदी जवळून गेली. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. जोरदार आवाज झाल्याने बाजूलाच कपडे धूत असलेली आद्यची आई प्रचिती पाटील या घाबरल्या. मात्र, पाण्याच्या टाकीत बंदुकीची गोळी सापडल्याने प्रकार उघड झाला.
गोळी घेतली ताब्यात
अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली. बंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या मुलाच्या अगदी जवळून गेली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. पाण्याच्या टाकीत गोळी सापडली आहे.- प्रचिती पाटील