आढी गवळवाडीत बांधलेले बंधारे गाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 03:50 AM2018-12-23T03:50:41+5:302018-12-23T03:50:54+5:30
आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव - आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा होती ती विहीर वर्षभर पडक्या अवस्थेत असून दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
महाड तालुक्यातील आढी गावात कृषी विभागाने, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ माध्यमातून पाणलोटमधून बंधारे बांधले खरे; पण हे सर्व बंधारे मातीच्या गाळाने भरले आहेत. गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावर कृषी विभागाने वर्षभरापूर्वी जवळपास तीन बंधारे बांधले आहेत. हे काँक्रीटचे बंधारे मातीने भरून गेले तर काही बंधारे कोसळून गेले आहेत. यामुळे मुख्य उद्देश या ठिकाणी सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी दोन विहिरी आहेत. यातील एक विहीर वर्षभरापूर्वी कोसळली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने ही विहीर अद्याप दुरुस्त केलेली नाही. यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील वापर करता येत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, या विहिरीतील पाणी मे अखेरपर्यंत पिण्यास मिळत असल्याने या विहिरीची दुुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत वाडीजवळ असलेल्या एका विहिरीतील पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. मात्र, हे पाणी फार काळ टिकून राहत नाही. यामुळे आतपासूनच बैलगाडीवर छोटे पिंप टाकून पिण्याचे पााणी आणण्याचे काम येथील तरुण करत आहेत. स्वदेस संस्थेने गावात नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र, या योजनेवर पाणी कमी असल्याने दोन दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले. सध्या तरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते.
भौगोलिक स्थिती पाहून गवळीवाडीचा वीर ग्रा. पं. मध्ये समावेश करावा
तालुक्यातील आढी गाव हे डोंगरावर वसले आहे. या गावाकडे जाणारा मार्ग लोणेरे गोरेगावमधून आहे. वीर गावापासून आढी गावाची गवळीवाडी फक्त एक ते दीड किमी अंतरावर आले. येथून आढी गावात जायचे असेल तर एक तासाची पायपीट करून गावात जावे लागते. आढी गवळीवाडीला रस्तादेखील वीर गावातूनच आहे. जेमतेम २० ते २५ घरांच्या वाडीत ग्रामस्थांना एखाद्या दाखल्याकरिता मात्र तासाभराची पायपीट किंवा लोणेरे मार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाडीचा समावेश वीर ग्रामपंचायतीत करण्याची मागणी होत आहे.