शाहरुख खानचे वास्तव्य राहिलेल्या थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीचा बंगला बेकायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 11:18 PM2018-02-01T23:18:10+5:302018-02-01T23:18:26+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे वास्तव राहिलेल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीच्या जागेतील बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड हे बेकायदा बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने, देजा व्ही फार्म कंपनीला बॉम्बे टेनेन्सी अॅण्ड अॅग्रिकल्चरल लँड अॅक्टच्या कलम 84सीसी अन्वये गेल्या चार दिवसांपूर्वी रितसर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
जयंत धुळप
रायगड- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे वास्तव राहिलेल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीच्या जागेतील बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड हे बेकायदा बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने, देजा व्ही फार्म कंपनीला बॉम्बे टेनेन्सी अॅण्ड अॅग्रिकल्चरल लँड अॅक्टच्या कलम 84सीसी अन्वये गेल्या चार दिवसांपूर्वी रितसर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
जमीन अकृषक वापर करण्यापूर्वी रितसर परवानगी आवश्यक
देजा व्ही फार्म कंपनीने शेतीची जमीनीची खरेदी-विक्री करण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. शेती कारणास्तव कंपनीने ही सुमारे 19 हजार 960 चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. परंतु सद्यस्थितीत या जागेत आता त्यात एक बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड आहे. शेतजमिनीचा वापर अकृषक कारणासाठी करण्यापूर्वी आवश्यक असणारी परवानगी या कंपनीने घेतली नसल्याने संबंधित महसुली कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यावर ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान देजा व्ही फार्म कंपनीच्या मालकीच्या जमिनीच्या सरकारी दस्तावेजात अभिनेता शाहरुख खान याचे कुठेही नाव नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.