एसटीत सोशल डिस्टन्सचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:49 AM2020-08-17T01:49:59+5:302020-08-17T01:50:05+5:30

ही बाब अतिशय गंभीर असूनही म्हसळा तालुका प्रशासन व एसटी प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.

The burden of social distance in ST | एसटीत सोशल डिस्टन्सचा बोजवारा

एसटीत सोशल डिस्टन्सचा बोजवारा

Next

अरुण जंगम
म्हसळा : श्रीवर्धन एसटी आगाराकडून या महिन्यात म्हसळा तालुक्यातील काही फे ऱ्यांची प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. मात्र, एसटी चालक वाहकांकडून सर्रास नियमबाह्य वाहतूक केली जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असूनही म्हसळा तालुका प्रशासन व एसटी प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्य सरकारने निर्धारित केलेल्या नियमानुसार, एका बसमध्ये जास्तीतजास्त २२ प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, श्रीवर्धन आगारातील बसेसमध्ये एका वेळी ६० ते ७० प्रवासी वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी बसमधील आसनसंख्या २२ आहे. प्रत्येक सीटवर एक, याप्रमाणे २२ प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, श्रीवर्धन एसटी महामंडळाकडून उघडउघड सरकारच्या आदेशाचे लक्तरे काढली जात आहे.
कामगिरीवर असणाºया चालक-वाहकाच्या तोंडांना मास्क लावलेले कमी प्रमाणात निदर्शनास येते. आगारातून सॅनिटायझर उपलब्ध होते किंवा नाही, याविषयीही प्रश्नचिन्ह आहे. एसटी बसमधून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना वाजवी कारणाशिवाय प्रवासबंदी करण्यात आलेली आहे, तरीही त्यांची नियमित वाहतूक केली जात आहे.
श्रीवर्धन आगारातून पनवेल, नालासोपारा व श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील काही ग्रामीण भागांत बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन आगारातील कामगारांशी संवाद साधला असता, फेरीनिहाय उत्पन्नाची विचारणा केली जाते. त्यामुळे आम्ही जास्तीतजास्त प्रवासी घेतो, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
>एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष : नियमानुसार प्रवासी वाहतूक केल्यास चालक-वाहकांच्या जीवितास धोका होणार नाही. मात्र, एसटी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रात्रवस्तीला झोपण्याची सोय नाही. उघड्यावर नैसर्गिक विधीला जावे लागते. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागातील सर्व ठिकाणी उंच गवत उगवलेले आहे. किमान नैसर्गिक विधीची सोय व्हावी. नियमानुसार प्रवाशांची संख्या घेणे बंधनकारक करावे, अन्यथा चालक-वाहक यांच्या माध्यमातून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे संबंधित चालक-वाहकांनी सांगितले.
>गर्दीमुळे आमच्याही जिवास धोका
वाहक-चालक यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लॉकडाऊनमुळे महामंडळ डबघाईला आले आहे, त्यामध्ये शासनाने दिलेल्या अटीनुसार सदर मार्गावर बस चालविल्यास अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी उत्पन्न मिळणार. त्यामुळे आम्ही प्रत्येक थांब्यांवरील प्रवासी घेत आहोत. प्रवासी न घेतल्यास किंवा बसमध्ये नियमापेक्षा कमी प्रवासी असल्यास जेवढे कमी प्रवासी आहेत, त्या प्रमाणात घ्यावयाचे म्हटल्यास कोणास घ्यायचे व कोणास नाही घ्यायचे, असा प्रसंग ओढावतो.नाईलाजास्तव आम्हाला अतिरिक्त मार्गावर बस नसल्याने प्रवाशांना घ्यावे लागते. वास्तविक, कोणत्या मार्गावर किती उत्पन्न मिळते, याचा पूर्ण तपशील कार्यालयाकडे असतो. त्यामुळे सदर मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असेल, तर विभागाने त्या-त्या मार्गावर बसेसची संख्या वाढविणे गरजेचे आहे. बसची संख्या कमी असल्यास आपोआपच त्या मार्गावर गर्दी होणार. त्यामुळे आमच्याही जिवास धोका आहे, याची जबाबदारी कोण घेणार, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.
>नियमापेक्षा जास्त प्रवासी घेतले जाणार नाहीत, ज्या मार्गावर प्रवासीसंख्या जास्त असेल, त्या ठिकाणांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचप्रमाणे, १७ आॅगस्ट सोमवारपासून म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील आडमार्गावर ४१ नवीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
-एस.एम.जुनेदी, आगार व्यवस्थापक
>ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या मार्गांवर बससंख्या वाढविण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल.
- अनधा बारटक्के , विभागीय नियंत्रक, पेण, रायगड विभाग
<बसमधून २२ प्रवासीच प्रवास करू शकतात. या मार्गिकेवर जर प्रवाशांची संख्या जास्त असेल, संबंधित महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून या मार्गावर गाड्यांची संख्या नक्कीच वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अमित शेडगे, प्रांताधिकारी

Web Title: The burden of social distance in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.