उरण परिसरात भुरट्या चोऱ्या,वाढत्या घरफोड्या; चिरनेरमध्ये गावाच्या सुरक्षिततेसाठी युवकांच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:05 PM2024-01-17T18:05:06+5:302024-01-17T18:05:23+5:30
उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मधुकर ठाकूर
उरण : उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसही या वाढत्या प्रकाराला आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने गावकऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी चक्क युवकांची रात्रीची गस्ती पथके तयार केली आहेत.
उरण परिसरातील काही गावांमध्ये चोरी, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.चिरनेर गावाचाही यामध्ये समावेश आहे. भुरट्या चोऱ्या,घरफोड्यांच्या तक्रारीनंतरही पोलिस बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे स्वतःबरोबर गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सुरक्षिततेसाठी गावातील तरुणांचे रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी गस्ती पथके तयार केली आहेत.रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत गावातील नाके, गल्ली बोळात ही तरुणाच्या या पथकांनी गस्त घालत खडा पहारा देण्यास सुरुवात केली आहे.गस्तीचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.चिरनेर गावातील प्रमोद ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच चोर पळून गेले.
मारुती म्हात्रे, कमलाकर केणी यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र घरातील माणसांनी प्रसंगावधान राखून गस्ती पथकाला मोबाईलद्वारे संपर्क केला.चोरट्यांना गस्त घालणाऱ्या युवकांची चाहूल लागताच चोरांनी काढता पाय घेतला. गस्त घालणाऱ्या तरुणांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र चोरांनी शेतातून आड मार्ग काढून चोर पसार झाले. त्यामुळे चोरांचा हा चोरीचा प्रयत्न असफल ठरला.दहा दिवसांपूर्वी कळंबुसरे गावातील हेमंत नाईक, चंद्रशेखर राऊत, वसंत राऊत तर चिरनेर येथील ठकुबाई ठाकूर यांच्यासह इतर बंद घरातील दरवाजांच्या कड्या -कोयंडे तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, व रोख रकमेवर मोठा डल्ला मारला आहे. तसेच याआधी विंधणे, जासई, चिर्ले, धुतुम, बोकडवीरा, नागाव या सारख्या गावात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्या आहेत.
चोरट्यांकडे धारदार शस्त्र असून, चेहरा कापडांनी झाकून ठेवतात. या सराईत चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, चिरनेर परिसरात बंद असलेली काही घरे फोडून घरातील किमती ऐवज चोरून नेण्याचा धडाका लावला आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ मात्र हैराण झाले आहेत.त्यांच्यात घबराट निर्माण झाल्याने विनाकारण जागावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक असल्याचेही काही ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.खबरदारीची उपाययोजना रात्रीच्या वेळी तरुणांची गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत.तसेच मुख्य आणि गावातील रस्त्यावरील दुकानदार आणि ज्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या सर्वांना सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने फिरवून घेण्याची विनंती केली आहे.त्याचबरोबर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
----भास्कर मोकल
सरपंच : चिरनेर ग्रामपंचायत
चिरनेर गावात ग्रामपंचायतीने बेकायदा फेरीवाल्यांना गावात फिरण्यास सक्त मनाई केली आहे. गावात परप्रांतीय भाडेकरुंचीही डोकेदुखी वाढली आहे.
सचिन घबाडी
उपसरपंच: ग्रामपंचायत चिरनेर
घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक आहे.तरीही ग्रामपंचायत ,सरपंच यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविली आहे. लवकरच चोरांचा बंदोबस्त केला जाईल.
सतीश निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक-- उरण