बस दरीत कोसळून मुलाचा मृत्यू; १६ जण जखमी, कशेडी घाटातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:44 AM2021-01-01T00:44:35+5:302021-01-01T06:59:33+5:30
या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार मुंबई ते कणकवली जाणारी खासगी लक्झरी बस सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भोगाव गावच्या हद्दीत घडला.या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
विरार मुंबई येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स ही खाजगी लक्झरी बस कशेडी घाटातून कणकवली दिशेने जात असताना कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ८ वर्षांचा साई राजेंद्र राणे (राहणार तरळे सिंधुदुर्ग) हा जागीच ठार झाला. तर वासुदेव शेलार हे ७० वर्षांचे वयोवृद्ध एक तासापेक्षा जास्त वेळ गाडीत अडकून होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व पोलिसांना यश आले.
या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका व महाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रोपच्या साह्याने जखमींना बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलादपूर तहसीलदारांना समजतात तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणिवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटचालकाचे नियंत्रण सुटल्याने, बुलेट स्लिप होऊन माहामार्गावर पडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला असून राजेश बजरंगी सिंह असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मूनशी माजी असे जखमी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दोघांना बावखळ येथील हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले.