महाड : नवी मुंबईतील ऐरोली येथून रायगड दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या बसला परतीच्या मार्गावर असताना अपघात झाला. बस एका अवघड वळणार ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते.
रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रायगडापासून काही अंतरावर असलेल्या कोणझर गाव हद्दीत हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक दाखल झाले होते. ऐरोली येथून स्वामी समर्थ ट्रॅव्हलच्या बसने हे सर्वजण रविवारी सकाळी किल्ले रायगडावर आले होते. गड पाहून आल्यावर ते रायगडच्या पायथ्यावरून बसने परत निघाले होते.
महाड तालुक्यातील कोंझर घाटामध्ये एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. काहीजण किरकोळ जखमी आहेत. अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.