बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:51 AM2018-06-19T02:51:57+5:302018-06-19T02:51:57+5:30
नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते.
कर्जत : नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते. नेरळ विद्या भवन या शाळेतील अनेक विद्यार्थी जवळपासच्या गावातून येतात. परंतु शाळेच्या वेळेत एस.टी. नसल्याने विद्यार्थ्यांना अधिक पैसे देऊन खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. याची दखल महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी घेतली असून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर झाला आहे.
नेरळ शहरालगत धामोते गावात नेरळ विद्या भवन शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत परिसरातील सुमारे ३३० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत येणारे विद्यार्थी नेरळ शहरातील आजूबाजूची गावे, पाडे, आदिवासी वाड्यातून येतात.
प्राथमिक शिक्षण जवळपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतून पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेरळमध्ये शिक्षणासाठी यावे लागते. नेरळ विद्या भवन शाळेत येण्यासाठी पूर्वी पिंपळोली, वंजारपाडा आदी भागातून एस.टी. बस येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत यायची उत्तम सोय होत होती. सुमारे १०० विद्यार्थी बसने शाळेसाठी प्रवास करायचे. मात्र खराब रस्ते, कमी प्रवासी आदी कारण देऊन प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बस सेवा रद्द केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पैसे खर्च करून खासगी वाहनाने शाळेपर्यंत यावे लागत होते.
विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन नेरळ विद्या भवन शाळेचे परिवहन समिती अध्यक्ष दिनेश कालेकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बससाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये गुडवन ते नेरळ बसच्या मार्गाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यावर नेरळ विद्या भवन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी बस सेवा सुरू केली आहे. बससेवेचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ व उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही बस सकाळी ७ वाजता गुडवन येथून सुटणार आहे. त्यानंतर आंत्रट, काळ्याची वाडी, पिंपळोली, ताळवाडे खुर्द, तळवाडे बुद्रुक, वंजारपाडा, हंबरपाडा, दहिवली व धामोते शाळा अशा मार्गे विद्यार्थी घेत येणार आहे. बस सेवा सुरू झाल्याने गैरसोय टळल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गही आनंदित आहेत. बस फेरीच्या उद्घाटन कार्यक्र मासाठी जमलेल्या मान्यवरांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तर याच कार्यक्र मात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आली.