आविष्कार देसाई अलिबाग : राजस्थान येथील कोटामध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. त्या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परत यायचे होते. रायगड जिल्ह्यातील सुमारे २७ विद्यार्थ्यांना घेऊन एक बस मंगळवारी राजस्थानमधून सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रवाना झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खारघर येथे बस येणार असल्याची माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली.लॉकडाउन जाहीर झाल्याने सर्वच विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. अलिबागमधील श्रेया घरत ही विद्यार्थीनी २०१८ पासून रिझोनेन्स इनस्टीट्युटमध्ये आयआयटीसाठी तयारी करत आहे. कोरोनामुळे आम्ही सगळेच घाबरलो आहोत. घरच्यांपासून लांब असल्याने पालकांनाही चिंता आहे. मात्र आता आम्ही आमच्या घरी निघालो आहोत. त्यामुळे आनंद होत असल्याचे श्रेयाने सांगितले.सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अॅलेन साकार ग्राऊँडमधून बस निघाली आहे. राजस्थान सरकारच्या बस असल्या तरी त्याचे पैसे हे आपल्या सरकारने दिले आहेत. बसमध्ये एकूण २७ विद्यार्थी आणि पाच पालक आहेत. बसमध्ये बसण्याआधी सर्वांच्या आरोग्याची तपसणी करण्यात आली आहे, तसेच खारघरमध्ये आल्यावर देखील त्यांची तपासणी करण्यात येईल. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार त्यांना निरीक्षण कक्षात अथवा घरीच निरीक्षणाखाली १४ दिवस ठेवण्यात येणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.>पनवेल येथील १२, अलिबाग ४, पेण ३, खालापूर आणि कर्जत प्रत्येकी २ मुरुड, महाड, सानपाडा आणि लोणावळा प्रत्येकी १ असे एकूण २७ विद्यार्थी आहेत.
कोटामधून २७ विद्यार्थ्यांना घेऊन बस आज येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:02 AM