मत्स्य संग्रहालयासह व्यवसाय प्रशिक्षण केंद्र एकाच छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:03 AM2018-12-24T05:03:28+5:302018-12-24T05:03:39+5:30
मत्स्य विभागाची कोळीवाड्यातील प्रशासकीय इमारत धोकादायक होऊन मोडकळीस आल्याने मत्स्य व्यवसाय विभाग सातत्याने टीकेचा धनी बनत होता.
- जयंत धुळप
अलिबाग : मत्स्य विभागाची कोळीवाड्यातील प्रशासकीय इमारत धोकादायक होऊन मोडकळीस आल्याने मत्स्य व्यवसाय विभाग सातत्याने टीकेचा धनी बनत होता.
धोकादायक इमारत पाडून त्याच ठिकाणी नवी इमारत बांधण्याकरिता येणाऱ्या सीआरझेडसह अन्य सर्व समस्यांची विघ्ने आता दूर झाली असून, आता नव्या इमारतीकरिता दोन कोटी ४६ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. नव्या प्रशासकीय इमारतीत मत्स्य संग्रहालयासह मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आणि मत्स्यव्यवसाय संबंधित सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यात येणार आहेत.
गेल्या सात वर्षांपासून भाड्याच्या जागेतून होत होता कारभार जुन्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये विखुरली गेली होती. गेल्या सात वर्षांपासून ही सर्व कार्यालये भाड्याच्या जागेतून आपला कारभार करत आहेत. जुन्या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले आहे. सर्व परवानग्या मिळविल्यानंतर २३ जानेवारी २०१८ रोजी कार्यारंभ आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आला आहे. या संकुलासाठी दोन कोटी ४६ लाख रुपये खर्च येणार असून, याचे काम विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले आहे.
प्रशासकीय खर्चात होणार बचत
सध्या या सर्व कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून सुरू असून, प्रशिक्षण केंद्राला ३४ हजार ६८३ रुपये, तर मत्स्यव्यवसाय उपायुक्त कार्यालयाला २५ हजार ८०२ रु पये दरमहा भाड्यापोटी खर्च करावे लागतात. ते आता नव्या इमारतीच्या उभारणीअंती वाचणार आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या संकुलाचे बांधकाम होत आहे. ही इमारत मुख्यत: प्रशिक्षण केंद्रासाठी वापरली जाणार आहे. वर्गखोल्या, सभागृह यांच्यासह मत्स्यसंग्रहालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी दिली आहे.
संबंधित विभाग येणार एकत्र
जुनी इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे ती पाडून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला असून कामाला सुरूवात झाली आहे.
मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणारे विभाग एकत्र येणार आहेत. प्रशासकीय कामाकाजाबरोबरच जिल्हाभरातून येणारे मच्छीमार, सोसायट्यांचे पदाधिकारी यांना हे सोयीचे होणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय उपायुक्त अभयसिंह शिंदे-इनामदार यांनी दिली आहे.
मच्छीमार बांधवांचा त्रास होणार कमी
मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित कार्यालये एकाच ठिकाणी नसल्याने जिल्हाभरातून कामानिमित्ताने येणाºया मच्छीमार बांधवांना अनेक फेºया माराव्या लागत असत. परिणामी, मच्छीमार बांधवांना त्याचा खूप त्रास होत असे. आता या संकुलामध्ये परवाना विभाग, वसुली विभाग, उपायुक्तांचे कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, मत्स्यसंग्रहालय असे विभाग असणार आहेत. यासह एक मध्यवर्ती सभागृह राहणार असून, या ठिकाणी मच्छीमार बांधवांकरिता कार्यक्र म घेता येणार आहेत.