गजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:58 PM2020-09-27T23:58:55+5:302020-09-27T23:59:18+5:30
व्यवसाय ठप्प : किल्ले, धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने बंदच
मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळांना बसला आहे. पर्यटक येत नसल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडे-फार पर्यटक बाहेर फिराव्यास येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने ही ठिकाणे बंदच ठेवण्यात आली आहेत.
मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील बोट चालक व मालक प्रतीक्षेत आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी ३३ शिडाच्या बोटी, त्याचप्रमाणे मशीन बोट या एकाच जागेवर गेल्या मार्च महिन्यापासून बसून आहेत.
एके काळी गजबजणारी राजपुरी व खोरा बंदर सुनेसुने झाले असून, या ठिकाणी निरव शांतता दिसून येत आहे. शनिवार-रविवार या दोन्ही जेट्ट्यांवर मोठी गर्दी असायची, परंतु येथे कोणीही फिरकत नसल्याने शांतता पसरली आहे. बोटींची रेलचेल, आॅटोरिक्षा, टांगा स्वारी, शहाळी विक्रेते, सरबत, टोपी व गॉगल विक्रेते दिसेनासे झाले आहेत. फक्त शांतता असून, एके काळी शेकडोंच्या संख्येने असणारी वर्दळ शांत झाली आहे.