अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. गतवेळीपेक्षा १ टक्क्याने मतदानाचा टक्का घसरला असला तरी वाढलेल्या मतदार संख्येमुळे त्याचा फायदा कोणाला होणार हे ४ जून रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अनंत गीते की सुनील तटकरे हीच चर्चा सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्धव सेनेचे अनंत गीते यांच्यात खरी लढत झाली. वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांच्यासह दहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते; मात्र निवडणुकीत गीते आणि तटकरे यांचाच बोलबाला प्रचारात दिसत होता. तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत. प्रचारात दोन्ही उमेदवारांनी विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून परस्पर विरोधी प्रचार करण्यात धन्यता मानली. दोन्ही पक्षात असलेली नाराजीनाट्य याचा परिणामही काहीसा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गीते यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, हुसेन दलवाई, नसीम खान यासह इतर मान्यवरांनी सभा घेतल्या. शेवटच्या टप्प्यात तर इंडिया आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र होते. सुनील तटकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, नाजिम मुल्ला, रुपाली चाकणकर, रामदास आठवले यांनी प्रचाराला हजेरी लावली. त्यामुळे रंगत वाढली. रायगड लोकसभा मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदान झाले आहे. १६ लाख ६८ हजार ३७२ मतदारांपैकी १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ६ लाख ५८ हजार ७६४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६१.७७ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत १.२६ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला आहे. असे असले तरी मतदारांची संख्या वाढलेली आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे टक्का कमी झाला तरी वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जाणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
विधानसभानिहाय मतदानमतदार संघ २०१९ २०२४पेण १,९५,५६७ १,९५,६५३अलिबाग १,८९,७५८ १,९८,२८५श्रीवर्धन १,५२,६६४ १,५५,२५४महाड १,६८,५८० १,६३,६९६दापोली १,७१,९०७ १,६०,७९८गुहागर १,४१,७०९ १,३५,८७७एकूण १०,२०,१८५ १०,०९,५६३