आरक्षणासाठी आज बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:14 AM2018-08-09T03:14:10+5:302018-08-09T03:14:22+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Call for the closure today for reservation | आरक्षणासाठी आज बंदची हाक

आरक्षणासाठी आज बंदची हाक

Next

अलिबाग : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्येही बंद पाळण्यात येणार असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत.
ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याने तो विभाग वगळता राज्यात सर्वत्र बंद यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी पाठबळ दिले असतानाच महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीनेही पाठिंबा दिला
आहे.
मराठा क्रांती मोर्चाने याआधी काढलेले सर्व मोर्चे शांततेत काढले होते. त्या वेळी कोणतेही गालबोट त्या आंदोलनाला लागलेले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्याने जाळपोळसारख्या घटना घडल्या होत्या. आंदोलक हिंसक झाल्याने त्यांची पोलिसांबरोबर भिडत झाली होती. या आंदोलनादरम्यान एका युवकाचाही मृत्यू झाला
आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध ठिकाणी आत्महत्या करून जीवन संपवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढे होत असताना सरकार मात्र आंदोलकांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने वेळोवेळी केला आहे.
सातत्याने मागणी करूनही सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत असल्याची धारणा आंदोलकांची झाली आहे. सरकारला वठणीवर आणण्यासाठी ठोक आंदोलनाची भाषा आता आंदोलकांनी केल्याने आगामी काळातील मोर्चाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे, असे असतानाही आंदोलक आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.
राज्यात यापुढे मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठामधील काही संघटनांनी महाराष्ट्र बंदमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. परंतु आरक्षणासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्याचे काय, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी उपस्थित केला आहे.
गुरुवारचे आंदोलन शांततेत करण्यात येणार आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात होणारे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विविध व्यापारी असोसिएशन, कापड विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, विविध खासगी आस्थापनांना रायगड बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
>रायगड बंदचा परिणाम
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वडखळ येथे तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे (जुना महामार्ग) या ठिकाणी आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खालापूर, खोपोली, कर्जत, पनवेल, उरण येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहेत, तर माणगाव, महाड येथे रास्ता रोको होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चा गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहे, परंतु सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याने त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे सल्लागार इम्तीयाज पालकर यांनी सांगितले. पाठिंबा देण्याचे पत्रच त्यांनी दिले असल्याचे सांगितले.
>गुरु वारच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाड शहरामध्ये बुधवारी पोलिसांनी संध्याकाळी संचलन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे पोळ, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाड बाजारपेठ व शहरातील प्रमुख मार्गावर हे पोलीस संचलन करण्यात आले.

Web Title: Call for the closure today for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.