किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ ची हाक; पालकमंत्री, आमदारांच्या उपस्थितीत अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 08:18 AM2023-05-22T08:18:37+5:302023-05-22T08:18:51+5:30
आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सावरकर समिती, पुणेतर्फे मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सोहळ्याप्रसंगी उदय सामंत यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती शिवरायांवर पाहिली आरती व अनेक शिवगीते लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत, या अभियानाची सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून होत आहे, याबद्दल आयोजक समितीचे विशेष कौतुक केले. गोगावले यांनी प्रत्येकाने रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक व्हावे, असे आवाहन केले. तसेच शिवराज्याभिषेकदिनी राज्याच्या तिनही दलाकडून शिवरायांना शासकीय मान्यवंदना देण्याचा मानसही यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान हर घर सावरकर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वीर सावरकरांच्या शिवरायांवर रचित आरतीवर त्याचप्रमाणे शिवरायांच्या काही गीतांवर महिला नृत्यकलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे ‘वीर सावरकर’ या महानाट्यामधील कलाकार अभिषेक शाळू याने या नाटकातील काही संवादाचे यावेळी सादरीकरण केले. यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवा निवासी सैनिक शाळा तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांना सैनिकी शैलीत मानवंदना देत शौर्य प्रात्यक्षिके दाखवली.
कार्यक्रमाला महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, विशेष पोलिस दल अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर व्यक्ती, शिवभक्त व सावरकरप्रेमी संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
वर्षभरात घेणार ७५ कार्यक्रम
सावरकर समिती ही पुण्यातील सावरकरप्रेमींचा एक समूह असून, या समितीतर्फे ‘हर घर सावरकर’ हे अभियान राबवले जात आहे. राज्यभरात वर्षभरात एकूण ७५ कार्यक्रम राबवले जाणार आहेत. अभियानाची सुरुवात किल्ले रायगडावर करण्यात आली.
मी तात्पुरता पालकमंत्री
मी रायगडचा तात्पुरता पालकमंत्री आहे आणि ‘तात्पुरता’ हा शब्द मी का वापरत आहे हे गोगावले आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री बदलाची शक्यता बोलून दाखवली.