बिरवाडी : होळी सणात पोसते मागितल्याची तक्र ार दाखल झाल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांनी केले आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात होळी धूलीवंदन, रंगपंचमी, शिवजयंतीनिमित्त पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, सरपंच, महिला दक्षता समिती सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक ११ मार्च, २०१७ रोजी सकाळी ११ वाजता महाडच्या डी.वाय.एस.पी. प्रांजली सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते होते.काळानुसार सण साजरे करताना, प्रत्येकाने पर्यावरणासोबत कायद्याचे भान ठेवले पाहिजे, वाढते अपघात लक्षात घेता पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये व पुढील अनर्थ टाळावा. होळी, रंगपंचमी धूलीवंदन या सणात महिलांची छेड काढण्याचे प्रकार रोखण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असून गावातील होळी लावण्याच्या जमिनीबाबत वाद असल्यास त्यांची पूर्वकल्पना पोलीस प्रशासन व महसूल विभागाला द्यावी,असे आवाहनही सोनावणे यांनी केले. शिवजयंती उत्सव साजरा करताना न्यायालयाच्या निर्णयांचे पालन मंडळांनी करावे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १००हून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आली असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. (वार्ताहर)
होळीसाठी पोसते मागितल्यास खंडणीचा गुन्हा दाखल!
By admin | Published: March 12, 2017 2:33 AM