गावठी दारूविरोधात धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:01 AM2019-04-14T00:01:32+5:302019-04-14T00:01:37+5:30
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूच्या भट्टी व दारू नष्ट करण्याकरिता पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूच्या भट्टी व दारू नष्ट करण्याकरिता पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेंतर्गत पेण शहराजवळच्या आसनी गावच्या हद्दीत डोंगरभागांत अवैद्य गावठी दारूच्या पाच दारू भट्टी, २०० लीटर क्षमतेच्या १५ टाक्या आणि सुमारे २५०० लीटर दारूनिर्मितीचे रसायन असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा माल जागीच नष्ट करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे.
शुक्रवारी रावे गावचे हद्दीत रावे गावच्या पश्चिम खाडीकिनारी दलदलीमध्ये छापा घालून जमिनीखाली व झाडीझुडपात लपवून ठेवलेले १०० लीटर क्षमतेच्या ४० प्लॅस्टिक टाक्या, त्यातील गुळमिश्रीत रसायन, पाच मोठ्या लोखंडी टाक्या तसेच दारूनिर्मितीचे इतर साहित्य, असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा अवैध माल जागीच नाश करून कारवाई केली आहे.
पोयनाड पोलीसठाण्याच्या हद्दीत श्रीगाव नाका येथे १३ हजार २९४ रुपये किमतीच्या बेकायदा दारूसह एकाला अटक करण्यात आली आहे. तर वडखळ पोलीसठाणे हद्दीत कारावी गावाच्या हद्दीत जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या गोवा गेट समोरील पाटील किराणा स्टोअर्सच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये १० हजार ३३८ रु पये किमतीच्या देशी विदेशी दारू विक्र ीचा परवाना नसताना बेकायदेशीर स्वत:च्या ताब्यात बाळगून विक्र ी करीत असताना एकाला अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलीसठाण्याच्या हद्दीत पुलाचीवाडी येथे एक हजार २८० रुपये किमतीच्या बेकायदा गावठी दारूसह एकाला अटक करण्यात आली आहे.