कर्जत : शहरात मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. भटक्या कुत्र्यांविरुद्ध कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास कर्जत शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होऊ शकतो.
कर्जत शहराच्या हद्दीवर जवळपासच्या अन्य शहरातील कुत्रे आणून सोडले जातात अशी ओरड नेहमी होत असते. मग ते भटके कुत्रे मोकाटपणे अन्नाच्या शोधात शहरी भागात प्रवेश करतात आणि त्यांना काही खायला मिळाले नाही तर ते कुत्रे मानवी वस्तीत घुसून लोकांना चावे घेतात. कर्जत शहरात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य कर्जतचे नागरिक ठरले आहेत. त्यामुळे कर्जत नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कर्जत नगरपालिका आरोग्य विभागाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्या कामाचा ठेका काढला. नवी मुंबईमधील दि अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने कर्जत शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण कामाचा ठेका मिळविला. त्या ठेक्यामध्ये संबंधित संस्थेने भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांचे निर्बीजीकरण करतानाच त्यांना पकडून आणणे. आठ दिवस सांभाळणे, वाहतूक करणे, शस्त्रक्रिया करणे, अशी कामे ठरवून दिली आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या कुत्र्यांच्या उजव्या कानांवर ‘व्ही’ असे अक्षर लिहून ठेवणे, अशी कामे करण्यासाठी संबंधित संस्थेला नर कुत्र्यासाठी १३०० रुपये, मादीसाठी १४८७ रुपये आणि जखमी कुत्र्यांसाठी ८५० रुपये नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत.
कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात अशा भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यात कुत्रा चावल्यानंतर त्या रुग्णाची होणारी धावपळ जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा उप रुग्णालय यांनी दूर करण्याची गरज आहे. कारण आज तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाच्या लसींचा तुटवडा आहे.
त्याच वेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातही वेगळी परिस्थिती नसून कर्जत तालुक्यातील रुग्णांना मग लस घेण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यात कुत्रा चावल्यानंतर होणारे परिणाम याबाबत जागरूकता नसल्याने रुग्ण घाबरतात आणि ते खासगी रुग्णालयात पोहोचतात, त्यामुळे भटक्या आणि मोकाट कुत्रांचे निर्बीजीकरण ही मोहीम शासनाने हाती घेण्याची गरज आहे, असे मत सामान्य जनता व्यक्त करीत आहे.