पेण : गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील जनतेला स्वच्छ, सुरक्षित अन्नपदार्थ व मिठाई उपलब्ध व्हावी, याकरिता अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात अन्न पदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकूण तीन पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून अन्नपदार्थ तपासणी आणि दोषी आढळल्यास अन्नपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दिलीप संगत यांनी दिली आहे.
गतवर्षी गणेशोत्सव काळात अन्न औषध प्रशासनाच्या विशेष तपासणी पथकांनी एकूण ९५ अन्नपदार्थ निर्माते व विक्रेते यांच्यावर कारवाई केली होती. तर सहा ठिकाणी बनावट व कमी दर्जाचे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्याची कारवाई केल्याचे उपायुक्तांनी सांगितले.जिल्ह्यात आतापर्यंत खाद्यतेल, रवा, मैदा, बेसन, दूध, मिठाई व इतर अन्नपदार्थांचे एकूण ३९ नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच, अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाकरिता चाकरमानी लाखोंच्या संख्येने मुंबईतून कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासादरम्यान ते चहा-नाश्ता वा भोजनाकरिता उपाहारगृह, हॉटेलमध्ये थांबतात. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये चांगले, स्वच्छ दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, याकरिता गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेलची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत नऊ हॉटेल्सची तपासणी करून त्यांना अन्नपदार्थ तथा स्वच्छता सुधारणाविषयक नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही कारवाई सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येते.सणासुदीच्या काळात म्हणजे श्रावण, गणपती, नवरात्र आणि पुढे दिवाळी सणापर्यंतच्या कालावधीत मिठाई तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात खवा परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून रायगडमध्ये येत असतो. या खव्याचे नमुने घेऊन तेदेखील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असतात. परिणामी, आरोग्यास अपायकारक मिठाई निर्मितीसच प्रतिबंध करण्यात यश आल्याचे उपायुक्तांनी सांगितले.