उरण : उरण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक वीजबिलापोटी असलेल्या सुमारे १६ कोटींच्या थकीत रकमेपैकी मार्चपर्यंत सक्तीच्या वसुलीनंतरही फक्त पाच कोटी रुपयांची वसुली करण्यात उरण महावितरणला यश आले आहे. उरण तालुक्यामध्ये कोरोनाच्या काळातील महावितरण विभागाची विजेपोटी सुमारे १६ कोटींची वीजबिले थकीत आहेत. यामध्ये शहरी, ग्रामीण ग्रामपंचायतींच्या दिवाबत्तीची साडेआठ कोटी, घरगुती आणि इतर वीजबिलांपोटी साडेसहा कोटी आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या वीजबिलांची ७० लाख अशी एकूण सुमारे १६ कोटींची वीजबिले थकीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतर उरण महावितरणचे उपअभियंता हरिदास चोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात जोरदार थकीत बिले वसुली मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटीस बजाविल्यानंतरही वीजबिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे कारवाईचा बडगा उगारत ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी जमेल तशी थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली आहे.मात्र सक्तीच्या वसुलीनंतरही ग्रामपंचायतींकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे साडेसहा कोटींच्या थकीत रकमेपैकी फक्त सहा लाखच रुपये जमा झाले आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर टप्पाटप्प्याने बिले भरण्याची तयारी ग्रामपंचायतींनी दाखविली आहे. त्यानंतरच ग्रामपंचायतींचा खंडित वीजपुरवठा पुन्हा एकदा पूर्ववत केला आहे.
कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने निदर्शने- थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर ग्राहक, ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक, हाणामारीचे प्रकार घडू लागले आहेत. काही ठिकाणी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांनी पट्ट्याने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. - त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोपींवर अटकेची कारवाई केली जात नाही तोपर्यंत कामकाज न करण्यासाठी उरण वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर निदर्शने केली. अखेर अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींवर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतरच कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू केले.