जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:05 PM2019-10-13T23:05:23+5:302019-10-13T23:05:42+5:30
उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : प्रचारातील शेवटच्या रविवारी मतदार भेटीवर दिला जोर
- आविष्कार देसाई
अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त आठ दिवस उरले आहेत, तर प्रचाराला फक्त सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आज प्रचारातील शेवटचा रविवार असल्याने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटी, गावबैठका यावर प्रामुख्याने उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपापला मतदारसंघ पालथा घालत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते.
सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने आघाडी विरोधात युती अशीच लढत पाहावयास मिळत आहे. अपवाद फक्त उरण, अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले आहे. तर अलिबागमध्ये काँग्रेसच्या उमेदवार अॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात त्यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे, तसेच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानेश लांबे, मोईझ शेख यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पडली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. प्र ितस्पर्धी वाढल्याने या उमेदवारांना विरोधकांबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने त्यांची क्रयशक्ती अधिक खर्च होत असल्याचे दिसून येते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने आता रंगत चढू लागली आहे.
प्रचंड उन्हात
पायपीटच्सकाळी ७ वाजल्यापासून उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत होते.
च्प्रचंड उन्हाचा तडाखा असतानासुद्धा त्यांनी पायपीट केली.
च्वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक पातळीवरील नेत्यांवर धुरा
१नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी पेण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती.
२राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दिग्गज नेते सोडले तर विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
३१९ आॅक्टोबरला प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने प्रचारातील आजचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या, अशी विनंती मतदारांना केली.