रेल्वे ट्रॅक वापराचा करार रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:50 PM2019-03-01T23:50:39+5:302019-03-01T23:50:42+5:30

अनंत गीते : आरसीएफ कंपनीला भरला दम

Cancel the use of rail track access | रेल्वे ट्रॅक वापराचा करार रद्द करा

रेल्वे ट्रॅक वापराचा करार रद्द करा

Next

अलिबाग : आरसीएफ कंपनीच्या अखत्यारित असणारा रेल्वे ट्रॅक एखाद्या खासगी कंपनी अथवा खासगी पोर्टला वापराला देण्याचा करार केला असेल तर आरसीएफ कंपनीने तो तातडीने रद्द करावा, अन्यथा कारवाईला तयार राहावे, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिला.


अलिबागला रेल्वे सुरू करताना आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर केला जाणार आहे; परंतु याच ठिकाणी एका खासगी कंपनीच्या पोर्टचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर पूर्ण क्षमतेने खासगी कंपनीने केल्यास अलिबागला लोकल आणण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे गीते यांनी पीएनपी या खासगी कंपनीचे नाव न घेता आरसीएफ कंपनीला शिवसेना स्टाइलने फटकारले.


अलिबाग येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात अनंत गीते बोलत होते. अलिबाग रेल्वेने जोडण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पेण आणि रोहे तालुके हे लोकलने जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता माणगावपर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे; परंतु अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेसाठी अडथळा निर्माण होत आहे. येथील रेल्वे ट्रॅक हा आरसीएफच्या मालकीचा आहे. आरसीएफ कंपनी ही सरकारचा अंगीकृत भाग आहे, त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे धाडस करू नये. रेल्वेमंत्री, खत व रसायनमंत्री आणि आरसीएफ प्रशासन यांना याबाबत पत्र व्यवहार करून या संबंधीची माहिती दिली असल्याचेही अनंत गीते यांनी सांगितले.

कोकणातील रेल्वे विद्युतीकरण करण्यावर भर
अलिबागमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यांना रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यांना रेल्वेची सुविधा दिल्याने अलिबागकरांचेही जीवनमान बदलणार आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे चुकीचे पाऊल उचलू नये, असा इशारा गीते यांनी दिला. कोकणातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, त्यामुळे कोकणात रेल्वे लवकरच विजेवर चालण्यास मदत मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cancel the use of rail track access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.