कांता हाबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचा प्रचार रंगात आला आहे. मोठ्या आर्थिक उलाढालीच्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना उमेदवारी नाकारली आहे, त्यातील काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. दरम्यान, अशा अनेकांवर त्यांच्या पक्षांनी बडतर्फ करण्याची कारवाई सुरू केली असून अशा उमेदवारांना आता धस्स होऊ लागले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. थेट सरपंचपदासाठी ४ आणि सदस्याच्या १७ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या १०८ उमेदवारांपैकी आपल्याला अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यात शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या तीन कार्यकर्त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे,त्यातील एक कार्यकर्ता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आपल्या पक्षाच्या प्रमुख उमेदवारांविरुद्ध थेट सरपंचपदाची निवडणूक लढवून पक्षाविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता असलेले शंकर घोडविंदे यांनी देखील आपली उमेदवारी कायम ठेवून रिंगणात आहे. त्यामुळे या सर्वांवर पक्षातून बडतर्फ होण्याची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युवा सेनेचे हर्षल विचारे हे प्रभाग एकमधून तर शिवसेना गटनेते संदीप उतेकर हे प्रभाग पाचमधून शिवसेना-भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवार यांच्याविरुद्ध उभे आहेत. त्यावेळी युवा सेनेचा कार्यकर्ता अजिंक्य मनवे यांनी शिवसेनेकडून प्रभाग पाच आणि सहामध्ये डावलण्यात आल्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मनवे आणि त्यांचे वडील संजय मनवे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी प्रभाग एकमधील उमेदवार हर्षल विचारे, प्रभाग पाचमधील उमेदवार संदीप उतेकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मृणाल खेडकर यांनी युतीमधून उमेदवारी नाकारल्याने युतीच्या उमेदवार यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. खेडकर यांच्याकडे भाजप महिला मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी पद असताना देखील त्यांच्या उमेदवारीनंतर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या वेळी प्रभाग एकमधून उषा पारधी, वर्षा बोराडे आणि थेट सरपंचपदासाठी प्रवीण ब्रम्हांडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यातील ब्रम्हांडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता, तर वर्षा बोराडे या भाजपच्या महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाने कठोर निर्णय घेत त्या चारही कार्यकर्र्त्यांचे पक्षातून निलंबन केले आहे. त्यामुळे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांच्या पोटात धस्स झाले आहे.
दुसरीकडे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष आपल्या पक्षातील कार्यकर्ते यांच्याबद्दल कोणतीही भूमिका अद्याप घेत नाही.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार की नाही? हे देखील स्पष्ट झाले नाही.मात्र, एका पक्षाने कारवाई केल्याचे जाहीर केल्याने अन्य पक्ष देखील उमेदवारी नाकारल्यानंतर आपली उमेदवारी कायम ठेवणाºया उमेदवारांच्या विरुद्ध कारवाई सुरू करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्या असलेल्या कविता शिंगवा यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट सरपंचपदावर आणि त्यांचे पुत्र हरेश शिंगवा यांनी प्रभाग एकमधून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
आरपीआयचे नेरळ शहर अध्यक्ष बाळा संदानशिव यांना देखील पक्षाने निलंबित केले असून आरपीआय आठवले गटाची नेरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी असल्याने आपण नेरळ शहर प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी अनिल सदावर्ते यांच्याकडे दिली असल्याची माहिती अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी दिली आहे.शिवसेना पक्षात एखाद्या शिवसैनिकावर कारवाई करण्याचे अधिकार हे पक्षप्रमुख यांच्याकडे आहेत. आमच्याकडून त्याबाबत अहवाल वरिष्ठ यांच्याकडे गेल्यानंतर वरिष्ठांचे आदेशाने आम्ही त्या सर्वांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.- उत्तम कोळंबे, तालुका प्रमुख शिवसेना,कर्जत
आम्ही नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलो असून पक्षाची प्रतिमा ही शिस्तबद्ध पक्ष अशी असून तशीच राहणार आहे.- पंढरीनाथ राऊत, तालुकाध्यक्ष, भाजपशेतकरी कामगार पक्षाची मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी होती,ती या वेळी देखील कायम असून उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाला अडचणीत आणण्याची भूमिका चुकीची आहे. त्या उमेदवाराबाबत आणि त्यांच्या सोबत काम करणाºया उमेदवार यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना कळविले आहे.- प्रवीण पाटील,तालुका चिटणीस, शेकापआमच्या पक्षामध्ये बंडखोरी हा विषय कधीच नव्हता,त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमधील आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी तसा प्रयत्न केला आहे,त्यावर पक्ष निर्णय घेणार आहे. तो अधिकार आम्ही वरिष्ठांना दिला असून त्यावर शिक्कामोर्तब झालेले दिसेल.- निकेश म्हसे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मी आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या सल्ल्याने नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काम करीत आहे. प्रभाग दोनमधील सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे.- बाळा संदानशिव, आरपीआय बडतर्फ शहर अध्यक्ष