- जयंत धुळप अलिबाग : राज्यभरातील विविध जिल्ह्यातून रायगड पोलीस दलातील ७६ पुरुष व ३३ महिला अशा एकूण १०९ जागांसाठी एकूण ९ हजार ९६५ पुरुष तर २ हजार ९० महिला उमेदवार असे एकूण १२ हजार ५५ उमेदवार रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणा-या अलिबाग शहरात रविवारी दुपारपासून येण्यास प्रारंभ झाला. या उमेदवारांसाठी अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या मैदानावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, यासाठी शामियाना उभारण्यात आला असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. प्रथमच भरतीसाठी येणाºया उमेदवारांची राहण्याची सोय करण्यात आल्याने ते भारावून गेले.राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीकरिता हजारो उमेदवार केवळ नोकरीच्या अपेक्षेने येत असतात. एखाद्या हॉटेलमध्ये राहून पोलीस भरतीकरिता जाणे हे या आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांकरिता केवळ अशक्य असते. परिणामी हे सारे उमेदवार बसस्थानके, उघडी मैदाने, फूटपाथ अशा ठिकाणी अपरिहार्यतेने रात्री झोपून रात्र कशीबशी काढतात, प्रातर्विधी आणि आंघोळीची सोय नाही. अपुºया झोपेमुळे अनेक उमेदवारांना मैदानी चाचणीच्यावेळी चक्कर येण्यासारखे प्रकार घडतात आणि त्यातूनच उत्तीर्ण-अनुत्तीर्णतेचा निर्णय होतो. कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवाराची मानसिकता शांत असली पाहिजे, त्याकरिता त्याची झोप व्यवस्थित झालेली असली पाहिजे, कोणत्याही गैरसोयीचा तणाव त्याच्या मनावर नसला पाहिजे. अशा सर्व पार्श्वभूमीवर नव्याने पोलीस दलात दाखल होण्याकरिता येणाºया या उमेदवारांच्या निवाºयाकरिता आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार गेल्या दोन-तीन पोलीस भरतीपासून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मनाला सतत अस्वस्थ करीत होता. वराडे यांनी आपल्या मनातील हा अस्वस्थ करणारा हा विचार अलिबागचे सामाजिक मानसिकतेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना भेटून त्यांना सांगितला. नगराध्यक्ष नाईक यांना देखील हा विचार मनापासून पटला. आपल्या नगरीत येणाºया उमेदवारांचे आपण किमान आदरातिथ्य करायला हवे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नाईक यांनी वराडे यांच्या समवेत पोलीस मुख्यालयाच्या मार्गावरील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलचे मैदान गाठले. पाहणी केली आणि तेथे तत्काळ मोठा शामियाना उभारण्याचा निर्णय घेतला. प्रशांत नाईक मित्र मंडळाने स्वखर्चातून शामियानाची उभारणी तर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाण्याची व शौचालयाची व्यवस्था नगराध्यक्ष नाईक यांनी करुन वराडे यांच्या ताब्यात हा शामियाना दिला.अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांची संवेदनशीलता आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची सामाजिक बांधिलकी असे आदर्श सूत्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस भरतीच्यावेळी अमलात आले तर राज्याच्या पोलीस दलात नव्याने येणाºया तरुण उमेदवारांची केवळ सोयच होईल असे नाही तर पोलीस दलात दाखल होताना समाजाप्रती एक सकारात्मक मानसिकता त्यांच्यामध्ये प्रथमपासूनच निर्माण होईल.रविवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार उमेदवार येथे दाखल झाले. शामियानातील मोफत निवास व्यवस्था पाहून ते सारे थक्कच झाले. यापूर्वी चार वेळा अत्यंत हलाखीच्या अवस्थेत पोलीस भरतीस गेलेला आणि उस्मानाबादमधून अलिबागला आलेला रमेश खडके म्हणाला, राहायला पैसे देणे केवळ अशक्य होते म्हणून मी आणि माझे मित्र या पूर्वीच्या भरतीच्यावेळी एसटी बस स्थानकावर झोपलो होतो.आमच्याकडे पर्यायही नव्हता. पण आज येथे अलिबागचे पोलीस निरीक्षक आणि अलिबागचे नगराध्यक्ष यांनी आम्ही त्यांचे कोणीही नातेवाईक नसतात ही मोफत राहाण्याची सोय केली, याच्याबद्दल काय म्हणावे हे खरं सुचत नाही. आम्ही त्यांना भेटून नक्की आभार व्यक्त करणार आहोत, असे खडके याने सांगितले.देशाकरिता बलिदान दिलेले आपले माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य ज्या शाळेत शिकले त्याच शाळेच्या मैदानावर आम्ही राहिलो होतो, ही गोष्ट आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रिया परभणी जिल्ह्यातून आलेल्या राकेश सरके या उमेदवाराने दिली.
पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार गेले भारावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:08 AM