- रोहित नाईकपाचाड (रायगड) : दरवर्षी तिथीनुसार स्वराज्याची राजधानी किल्ले रायडावर शिवराजाभिषेक सोहळा साजरा करणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने नुकताच ३ व ४ नोव्हेंबरला शिवचैतन्य सोहळा पार पडला. यावेळी तब्बल ३४५ मशाली व पणत्या प्रज्ज्वलित करून पुन्हा एकदा किल्ले रायगड उजळविण्यात आला.महाराष्ट्राच्या विविध परिसरांतून मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांनी यावेळी पारंपरिक वेशभूषेत मशाली प्रज्ज्वलित करून किल्ले रायगड उजळवला. ऐन दिवाळीमध्ये स्वराज्याची राजधानी अंधारात असते आणि ही सल प्रत्येक शिवभक्ताला असल्यानेच पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या दारी असा निश्चय करत गेल्या सात वर्षांपासून हा नयनरम्य सोहळा पार पडत आहे. सुमारे ५०० हून अधिक शिवभक्तांनी या सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पूजनाने केली. येथून सर्वांनी एक व्यक्ती एक मशाल याप्रमाणे मशाली प्रज्वलित केल्या आणि या मशालींच्या उजेडात तसेच आम्ही मावळे ढोल ताशा पथकाच्या दणकेबाज सादरीकरणामध्ये महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली.होळीच्या माळावर शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर बोरिवली येथील आम्ही मावळे ढोल ताशा पथकाने सर्वांना आपल्या वादनाने मंत्रमुग्ध केले. मध्यरात्री १२च्या सुमारास राजदरबारामध्ये पालखी आणल्यानंतर अवघा दरबार मशालींच्या उजेडात प्रकाशमय झाला. महाराजांचे पूजन झाल्यानंतर उपस्थित शिवशाहीरांनी रात्र जागवून रायगडावर पुन्हा एकदा शिवशाहीचा अनुभव करुन दिला. यानंतर ४ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता रायगडावर दीपोत्सव सोहळा पार पडला. यावेळी ३४५ पणत्यांच्या उजेडात किल्ले रायगड उजळला. तसेच समितीच्या वतीने गडावरील प्रत्येक घरामध्ये फराळ वाटप करुन या सोहळ्याची सांगता झाली.-----------------------आकर्षक रोषणाई...यंदा पहिल्यांदाच महाराजांच्या मेघडंबरीवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाईने लक्ष वेधणारी ठरली. आम्ही मावळे संस्थेच्या प्रथमेश गव्हाणे आणि संदीप पिळके या तरुणांनी तब्बल ३-४ तासांची मेहनत घेत महाराजांचे सिंहासन उजळवले. यावेळी संपूर्ण मेघडंबरीला फुलांची सजावट करण्यात आली होती आणि त्यावर आकर्षक रोषणाई केल्याने हे नयनरम्य दृश्य या सोहळ्यात लक्षवेधी ठरले.-----------------------दिवाळीला आपण आपल्या घरी रोषणाई करतो, सर्व परिसर दिव्यांनी उजळवतो. पण शिवछत्रपतींच्या किल्ले रायगडाचे काय? राजदरबाराचे काय? ते दिवाळीतही अंधारातच असतात. तिथे दिव्यांची रोषनाई करणे हे आपले कर्तव्य आहे. ऐन दिवाळीत आपली राजधानी अंधारात राहणे हे कोणत्याही शिवभक्ताला पटणारे नसल्यानेच आम्ही दरवर्षी शिवचैतन्य सोहळा आयोजित करतो आणि यापुढेही हा सोहळा असाच सुरू राहील.- सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती
मशालींच्या प्रकाशात उजळली स्वराज्याची राजधानी, पहिला दिवा महाराजांच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:37 PM