कार ६० फूट दरीत कोसळली
By admin | Published: September 28, 2016 02:46 AM2016-09-28T02:46:01+5:302016-09-28T02:46:01+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी गावच्या हद्दीत मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेलेले पर्यटक मुंबईकडे परतत असताना एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडला. क्वालिस चालक शशिकांत भुवड (३०, रा. सांताक्रुझ) मुंबई हा आपल्या ताब्यातील कार (एमएच ०४ बीएन ५०८५) घेवून गणपतीपुळे ते मुंबई असे जात होते. कशेडी घाटात येलंगेवाडी गाव हद्दीत आला असता अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटून क्वालिस सुमारे ६० फूट दरीत कोसळली. या अपघातात चेतमा दोडिंया ही १८ वर्षे वयाची तरुणी डोक्याला जबरदस्त मार लागून जागीच ठार झाली. तर बाळकृष्ण सणस (४६), छाया वाडिया (४२), चालक शशिकांत भुवड यांना मुका मार लागून जखमी झाले आहेत. तर प्रिया भावेन (२३), नीता दोडिंया यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पो. उपनिरीक्षक अनिल अंधेरे, एएसआय मोरे, पो. ह. पिंगळे, पो. ह. खाडे यांनी ही ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आपद्ग्रस्तांना मदत
घटनेची माहिती कशेडी महामार्ग पोलिसांना समजताच पो. ह. क्षीरसागर, धुमाळ, झगडे, हसबे, बारगुडे, पोलीस मित्र महेश रांगडे यांनी जगत्गुरू स्वामी नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेवून सर्व आपद्ग्रस्तांना दरीतून वरती काढून जखमींना त्वरित पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.