लोकमत न्यूज नेटवर्करोहा : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील खांब येथे मध्यरात्री धावत्या कारने अचानक पेट घेतला. या अपघातात महाड येथील अॅक्सिस बँकेतील शाखा व्यवस्थापक व रोखपाल असे बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी सुदैवाने बचावले. मात्र, काही क्षणांतच गाडी खाक झाली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.महाड येथील अॅक्सिस बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर काम करणारे विनोदकुमार गोपीनाथ पिल्ले व बँकेचे रोखपाल विष्णू प्रसाद नायर, असे दोघे जण नेरुळ व खारघर येथे राहत असून, बँकेच्या कामानिमित्त ते नेरुळवरून महाडच्या दिशेने निघाले असता, मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील खांब येथे आल्या वेळी मॅनेजर विनोदकुमार पिल्ले यांच्या ताब्यातील कार क्र मांक एम. एच. ०६, ए. बी. २६८२मध्ये अचानक बिघाड होऊन कारच्या बोनेटमधून धूर निघत होेता. काहीतरी जळाल्याचे समजताच दोन्ही अधिकाऱ्यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या. क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला, ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कार मालक बँकेचे मॅनेजर विनोदकुमार पिल्ले यांची ९५ हजार रुपयांची नुकसानी झाली आहे. गाडीसहित कपडे व अन्य चिजवस्तू जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विनोदकुमार पिल्ले यांनी कोलाड पोलीस ठाण्यात घटनेविषयी माहिती दिली आहे. याप्रकरणी स.पो.नि. एम.एम. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.कॉ. पालांडे अधिक तपास करीत आहेत.
कोलाडजवळ धावत्या कारने घेतला पेट
By admin | Published: June 30, 2017 2:52 AM