अलिबाग : जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत एक रुग्णवाहिका २४ तास जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या परिसरात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या मृतदेहाची आता हेळसांड होणार नाही.
‘रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड’ या मथळ्याखाली लोकमतने २१ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर या रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी कोणतीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती.
जिल्ह्यामध्ये एकट्या खोपोली शहरामध्ये शववाहिनीची व्यवस्था आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यविधीसाठी नेणे गरजेचे होते. मृतांच्या नातेवाइकांनी फारच कष्ट घेत कशी तरी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली. त्यानंतर या मृतदेहाला स्मशानभूमीत नेता आले. यातील गंभीर बाब हीच आहे की, जिल्ह्यामध्ये एकही शववाहिनीची व्यवस्था नाही.
कोरोनाच्या कालावधीत मृतदेहाची हेळसांड होत असल्याने तातडीने शववाहिनी उपलब्ध होणे गरजेचे होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली. त्यानंतर एक खासगी रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली आहे. सध्या याच रग्णवाहिकेतून कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णाचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत एका रुग्णवाहिकेचे रूपांतर शववाहिनीत केले आहे, असेही डॉ. गवई यांनी सांगितले.
कायमस्वरूपी शववाहिनी खरेदी करावी
जिल्हा प्रशासनाकडे लाखो रुपयांचा आपत्ती निधी जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनेही कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याच निधीच्या माध्यमातून प्रशासनाने कायमस्वरूपी शववाहीनी खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. आपत्तीच्या कालावधीत जिल्हाधिकारी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून असा निर्णय घेऊ शकतात.