सावधान... पुढे रस्ता खचतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:34 AM2019-08-07T01:34:45+5:302019-08-07T01:34:58+5:30
रस्ता बंद होण्याची भीती; आदगाव-वेळास रस्त्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव मार्गावरील रस्ता खचत असल्याचे दिसते. सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीही केले नसल्याचे समोर येत आहे.
काही दिवसांपासून सतत पडणाºया मुसळधार पावसाने शनिवारी बोर्लीपंचतन शहराला जोडणाºया रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मंगळवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसासोबत समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे वेळास फाटा येथून दोन कि.मी.वर असणाºया रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. सध्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण पडण्याची भीती आहे. रस्त्यालगत समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आहे. मात्र, तोही पूर्ण मोडकळीस आला आहे. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो. आदगाव जाणाºया मार्गातून प्रवास करते वेळी वाहनचालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असताना त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनार्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
सागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती-ओहोटी, लाटांचा मारा या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास-आदगाव रस्ता पूर्णपणे खचला आहे. मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना या रस्त्याची कल्पना असूनदेखील कोणत्याही प्रकारची तत्काळ दुरुस्ती केली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांतच पडणाºया पावसामुळे साइडपट्टी खचल्याठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरुस्ती होऊन संरक्षक कठडे डागडुजी होण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.
वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्ता खचतो. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होतेय. कायमस्वरूपी पक्के रस्ते व्हावे.
- धवल तवसालकर, वेळास
वेळास-आदगाव रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
- श्रीकांत गणगणे,
उपअभियंता, सा. बां. विभाग