- मधुकर ठाकूर उरण : बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जलमार्गावरून कंटेनर मालाची वाहतूक करण्याचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती पीएनपी भारत मुंबई प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.धरमतर बंदरात २०१२ पर्यंत पडाव आणि बार्जमधून याआधी कार्गो, कंटेनर मालाची वाहतूक केली जात होती. धरमतर बंदर हे या भागातील कार्गाे मालकांसाठी माल उतरून घेण्याचे आणि पाठविण्याचे प्रमुख ठिकाण होते. मात्र, जेएनपीटी बंदराकडे वाढीव क्षमता नसल्याने २०१२च्याअखेरीस ही सेवा बंद करणे भाग पडले.२०१७च्याअखेरीस जेएनपीटी अंतर्गत बीएमसीटी हे चौथे बंदर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी ते धरमतर दरम्यान पडाव, बार्जद्वारे होणारी दैनंदिनी कंटेनर वाहतूक सेवा हाताळण्यासाठी पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. आणि बीएमसीटी प्रा.लि. यांच्याशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता पीएनपीला बीएमसीटी धरमतर येथील केंद्रातून ८० टीईयू २० फुटी इतक्या आकाराच्या माालाचे कंटेनर बार्जच्या साहाय्याने पुन्हा सुरू करता येणार आहेत. यामुळे कार्गाे मालकांचा खर्चही कमी होईल व त्यांच्या वेळेचीही बचत होणारआहे. बीएमसीटी आणि धरमतर यांच्या सागरी मार्गात पुन्हा एकदा पडाव आणि बार्जद्वारे कार्गो कंटेनर मालाची वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा कंपनीलाही लागून राहिल्याची प्रतिक्रिया पीएनपीचे संचालक सचिन टिपणीस यांनी व्यक्त केली.धरमतर हे एक तीन प्रकारच्या दळणवळणाची यंत्रणा उपलब्ध असलेले (ट्रायमॉडल) कार्यरत बंदर आहे. राष्ट्रीय महामार्ग-१७ पासून केवल दोन कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे आणि जलमार्ग अशा दोन्ही प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होण्यास मोठी मदत होईल. धरमतर येथील बंदर व्यापारासाठी आणि कंटेनर मालाची ने-आण आणि हाताळणी करण्यासाठी सक्षम असून, कंटेनर आणि कार्गो वाहतुकीशी संबंधित गोदाम, कंटेनर दुरुस्ती आदी आवश्यक सर्व सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळेच या परिसरातील व्यापाºयांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी बीएमसीटीच्या बरोबरीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे- सचिन टिपणीस, संचालक, पीएसपीधरमतर सारख्या बंदरातून बार्ज आणि पडावातून कार्गो आणि कंटेनर वाहतूक करण्यासाठी बीएमसीटीने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बीएमसीटी हा भारतीय बंदर आणि वाहतूक बाजारपेठेत लक्षणीय बदल घडवून आणणारा प्रकल्प आहे. २०१७च्या अखेरीस हा बीएमसीटी बंदर प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. भारत सरकारच्या बंदर विकासलक्षी सागरमाला उपक्रमाचा एक भाग असलेल्या या उपक्रमात पीएनपीच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.- सुरेश अमिरापू ,सीईओ, बीएमसीटी
धरमतर बंदरातून पुन्हा सुरू होणार कार्गो, कंटेनर वाहतूक; चौथे बंदर कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:33 AM