गोवा महामार्गावरील कारपेट उखडले
By admin | Published: June 17, 2017 01:48 AM2017-06-17T01:48:06+5:302017-06-17T01:48:06+5:30
मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टाकलेला कारपेट पहिल्याच पावसात उखडल्याने अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टाकलेला कारपेट पहिल्याच पावसात उखडल्याने अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
गतवर्षी सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली होती. बिना खड्ड्यांचा रस्ता शोधूनही सापडत नव्हता. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला होता. तर गणेशोत्सव काळात तर महामार्गावरील खड्डे म्हणजे मोठे आव्हानच ठरले होते. यावर तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही तोकड्या पडल्या होत्या.
संपूर्ण पावसाळा ऋ तूमध्ये वाहनचालक व प्रवासीवर्गाला महामार्गाच्या दुरवस्थेमुळे प्रचंड नरकयातना भोगाव्या लागल्या होत्या. यावर उपाय म्हणून पावसाळा ऋ तू संपताच ठिकठिकाणचे खड्डे भरणे व कारपेट टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवासीवर्गाला सुखद प्रवासाचा अनुभव घेता आला. परंतु हा सुखद अनुभव फक्त उन्हाळ्यापुरताच टिकला.
पावसाळा सुरू होताच महामार्गावर नव्याने कारपेट टाकलेल्या ठिकाणी खड्डे पडण्यास प्रारंभ झाल्याने कारपेटच्या कामाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात प्रवास जिकिरीचा होणार असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.