कार्टुन चित्रांच्या छत्र्या, रेनकोट सरस; यंदा दरात पाच ते सहा टक्के वाढ!
By निखिल म्हात्रे | Published: June 22, 2024 03:51 PM2024-06-22T15:51:25+5:302024-06-22T15:51:42+5:30
यंदा २०० पासून ८०० रुपये किमतीच्या छत्र्यांची विक्री सुरू आहे. त्यांच्या दरात ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे.
अलिबाग : बच्चे कंपनीचे कार्टूनचे वेड लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्यावर त्याची छाप पडलेली दिसते. पण, रेनकोट आणि छत्र्याही याच प्रभावाखाली आहेत. विशेषत: बच्चे कंपनीच्या या वस्तूंवर कार्टून हमखास दिसत आहेत. यंदा २०० पासून ८०० रुपये किमतीच्या छत्र्यांची विक्री सुरू आहे. त्यांच्या दरात ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे.
मागील आठवड्यापासून शाळेची पुस्तके, वह्या, दप्तर याबरोबरच छत्र्यांची खरेदी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी कार्टून प्रिंटची छत्री आणि रेनकोट उपलब्ध आहेत. या पावसाळ्यात लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टून्सचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, तर, लहान मुलींसाठी डोरा, बार्बी डॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेले रेनकोट बाजारात आहेत.
अशाच नवीन ट्रेंडच्या छत्र्या, रेनकोटसाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरीत आहेत. दरवर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ट्रेंड आणला जातो. यंदाही तसा प्रयत्न झाला आहे. बाजारात पारंपरिक छत्रीसोबतच रेनबो छत्री, थ्रीडी आणि रंग बदलणारी छत्री नव्याने दाखल झाल्या असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
बाजारात नवे काय?
नवनव्या फॅशनच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात सध्या रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. छत्र्या २०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. नामांकित कंपन्यांच्या चप्पल, शूज आहेत. अगदी १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.
सध्या बाजारात छत्री, चप्पल आदी कार्टून्सच्या डिझानचे असल्याने त्याचा खप वाढला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी जाणून घेत आता छत्र्यांवर कार्टूनच्या डिझाईन काढण्यात आल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत.
- रितेश जैन, छत्री विक्रेता
शाळेत जाताना माझ्याकडे शाळेसाठी लागणारे साहित्य आकर्षक असायला हवे असा नेहमीच हट्ट असतो. आता मी सहावीमध्ये आहे. दरवर्षी विविध कार्टून्स असलेले चप्पल, स्कूल बॅग, कंपास, रेनकोट, छत्री घेतो. यावर्षी ही डोरोमाॅनची ‘थीम’ घेतली आहे.
- पार्श्व कोर्लेकर, विद्यार्थी