पनवेल : तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकाने चाप लावला आहे. गेल्या तीन महिन्यात शंभरपेक्षा जास्त प्रकरणे या पथकाने बाहेर काढली आहेत. त्याच्याबरोबर त्यांच्याकडून पावणे तीन कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आणि आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. पनवेल मुंबईपासून अगदी जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तालुका आहे. सिडकोमुळे या भागाचा झपाट्याने विकास झाला, त्याचबरोबर प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराचा चेहरामोहराच बदलत आहे. नागरीकरणाचे लोन ग्रामीण भागात पसरले असून टोलजंग इमारती ठिकठिकाणी उभ्या राहत आहेत. बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेती, दगड आणि खडीची मागणी असल्याने या भागातील दगडखाणी त्याचबरोबर खडी क्र शर गेल्या काही वर्षात अतिशय तेजीत आहेत. त्याचबरोबर रेतीची मागणी पूर्ण करण्याकरिता वाघिवली, गणेशपुरी, उलवे, ओवळा, पारगाव, बेलपाडा या भागातील खाडीप्रवण क्षेत्रातून रेती उपसा होत होता. गेल्या काही वर्षात रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात खाडी पोखरून रेतीचा उपसा केला आहे. मात्र या विरोधात जिल्हाधिकारी शीतल उगले- तेली यांच्या आदेशानुसार तहसीलदार दीपक आकडे आणि गौण खनिज पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार बी.टी. गोसावी यांनी गेल्या महिन्यापासून मोहीमच उघडली आहे. त्यांनी काही दिवसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत धाडी टाकून रेती माफियांना सळो की पळो करून सोडले आहे. शेकडो ब्रास रेती जप्त केलीच त्याचबरोबर वाहतूक करणारे वाहने, सक्शन पंप, बार्ज हस्तगत केले. त्याचबरोबर खारघर, कामोठे, एनआरआय, नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. काहींना पोलिसांनी अटक सुध्दा केली. एकंदरीत गेल्या एक -दोन महिन्यापासून रेती उपसा जवळपास बंद करण्यास या पथकाला यश आले आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प, कारखाने, इमारती उभारताना बेकायदा उत्खनन केले जाते त्यांच्यावर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. (वार्ताहर)खडी क्रशर सीलबेलगाम असलेल्या पनवेल तालुक्यातील दगडखाण व क्र शर मालकांना ताळ्यावर आणण्याचे काम सुध्दा जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या नेतृत्वाखाली दीपक आकडे, बी.टी. गोसावी यांनी केले. एकूण पाऊणशे खडी क्र शरला त्यांनी सील ठोकले होते. मात्र ज्यांनी कागदपत्र सादर केले त्यांच्या क्र शर रिलिज करण्यात आल्या. संबंधितांकडून रॉयल्टी वसूल करण्यासही पनवेल तहसील कार्यालयाला यश मिळाले.
बेकायदा गौण खनिज प्रकरणी धाडसत्र सुरू
By admin | Published: November 26, 2015 1:56 AM