गणपती सणाला गालबोट लावणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार- डिसीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 07:21 PM2022-08-25T19:21:04+5:302022-08-25T19:21:37+5:30
डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे
मधुकर ठाकूर
उरण : डीजे लाऊन ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, गणपतीच्या मंडपात जुगार पत्ते खेळणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी आरास-देखावे उभारणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सक्त ताकीद देतानाच गणेशोत्सव साजरा करताना आपल्या बेकायदा कृतीतून सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी उरण येथे केले.
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे.त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.या उत्सव साजरे करताना उरण तालुक्यातील नागरिक, गणेश मंडळांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी बुधवारी (२४) संध्याकाळी डिसीपी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उरण पोलिसांनी आनंदी हॉटेलमधील हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीसाठी न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, न्हावा-शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे,उरण मुख्याधिकारी संतोष माळी,उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवणे,नायब तहसीलदार नरेंद्र पेडवी,उरण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे , गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शासकीय कमिट्याचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा,बेकायदेशीर पार्किंगमुळे होणारे वाहतूक कोंडी, भटकी कुत्री- मोकाट गुरे, खड्डेमय रस्ते, तलाव, समुद्र या विसर्जन ठिकाणी होणारी गर्दी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जणू तक्रारींचा पाऊसच पाडला.नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमी सारखी गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारुन नेली. गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार याची सर्वांनी च दक्षता घेण्याचे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले. डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे.विद्युत रोषणाई करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.समाजात तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील असे देखावे, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांची गय केली जाणार नसल्याचे सक्त ताकीद देतानाच अशी बेकायदा कृत्ये करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सक्तीचा इशाराही शिवराज पाटील यांनी दिला.