महाड : गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आणखी घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाने इमारत बांधकामाच्या देयकापोटी संबंधित ठेकेदाराला दिलेल्या दोन लाख रुपयांच्या धनादेशावर खाडाखोड करुन वीस लाख रुपयांची रक्कम हडप करणाऱ्या ठेकेदारावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै महिन्यात घडलेल्या या फसवणुकीच्या प्रकरणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एम.एस. मोरे यांनी विजयराज एन्टरप्रायझेस मुंबई (प्रोप्रा. दिनकर शिरसाठ) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. महाविद्यालयात सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठेका विजयराज एन्टरप्रायझेस यांना देण्यात आलेला होता. या कामाच्या देयकाचा दोन लाख रुपयांचा आयडीबीआय बँकेचा धनादेश या ठेकेदाराला देण्यात आला होता. या धनादेशावरील दोन लाख रु. रकमेपुढे एक शून्य वाढवून तसेच अक्षरी रकमेत खाडाखोड करुन प्राचार्या डॉ. आरती वानखेडे यांच्या खोट्या सह्या केल्या व धनादेशावर वीस लाख रु.ची रक्कम लिहिली. हा धनादेश बडोदा बँकेच्या उल्हासनगर शाखेत स्वत:च्या खात्यात जमा करुन बँकेतून वीस लाख रु.ची रक्कम हडप केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व बुधवारी हा गुन्हा महाड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)02 लाखांच्या रकमेऐवजी वीस लाख रु. संबंधित ठेकेदाराच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व बुधवारी हा गुन्हा महाड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
वीस लाखांची रोकड हडप
By admin | Published: October 08, 2015 12:03 AM