आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर सातत्याने प्रभावशाली ठरला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष विविध जातींना सोबत घेण्याचा नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आगरी-मराठा-कुणबी या जातीचे प्राबल्य अधिक प्रमाणात आहे. त्याचबरोबर दलित आणि मुस्लीम अशी व्होट बँक आहे, त्यामुळे जातीनिहाय होणारे मतांचे विभाजन टाळण्यासाठी संबंधित उमेदवारांना कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येते.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तटकरे हे गवळी समाजातून आलेले आहेत, तर गीते हे कुणबी समाजातून. तटकरे यांना विजयी करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे महाडमधील माजी आमदार माणिक जगताप, अलिबागमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी चंग बांधला आहे. जगताप हे मराठा आहेत, ठाकूर आणि पाटील हे आगरी समाजाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोळी समाजाच्या सुमन कोळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्र्णयानंतर न्यायालयात सादर केलेल्या अहवालात तो समाज कुणबी असल्याचा तपशील देण्यात आल्याने कुणबी मतदारांत अस्वस्थता आहे. त्याचवेळी धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे आदिवासींत नाराजी आहे. शिवाय आपल्याला आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजात नाराजी आहे. मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने त्या समाजातील बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आगरी-कोळी समाजालाही अपेक्षित सोयी-सुविधा न मिळाल्याने त्या समाजातही नाराजी आहे. भूमिपुत्र असून डावलले जात असल्याची भावना त्या समाजात तीव्र आहे.