अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय कवळे आणि त्यांचा मुलगा मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून विजय कवळे ओळखले जायचे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर कवळे यांच्या राजीनाम्यामुळे अलिबाग तालुक्यात उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे.मिलींद कवळे हे सध्या वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. कवळे पिता-पुत्र हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यासह करण्यात येणार आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेंव्हापासून विजय कवळे हे राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे हे त्यांच्यानंतर पक्षामध्ये आले होते. विजय कवळे, प्रकाश धुमाळ हे कायम सुनिल तटकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहीले होते. कवळे आणि धुमाळ हे तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात.विजय कवळे हे सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आहेत, तर मिलींद कवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. कवळे पिता पुत्रांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्याकडे पाठविले आहेत. राजीनाम्याचे स्पष्ट कारण समजू शकले, नसले तरी विकासकामात सहभागी करुन न घेतल्याचा राग त्यांच्या मनात असल्याचे समजते. एमएमआरडीए अंतर्गत अलिबाग तालुक्यात रेल्वे येत आहे. रेल्वे प्रकल्पासाठी सर्वाधिक जागा वरसोली ग्रामस्थांसह कवळे यांची ही संपादीत होणार असल्याचे बोलले जाते. ती जागा वाचवायची असले, तर सत्ता असणाऱ्या पक्षात सहभागी होणे आवश्यक होते. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यामध्यस्तीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना जमीन वाचविण्यासाठी साकडे घालता येईल. यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे.विजय कवळे, मिलींद कवळे यांचा राजीनामा प्राप्त झालेला नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी सांगितले.
कवळे पिता-पुत्रांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By admin | Published: January 25, 2017 4:58 AM