बिरवाडी : महाड तालुक्यातील वरंध व परिसरात पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर एका शेतकºयाच्या गुरांचा गोठा कोसळला आहे.
वरंध कुंभारकोंड येथे सुनील कोंडाळकर यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बुधवार २४ जुलै रोजी महाड पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सपना मालुसरे, जि.प. सदस्य मनोज काळीजकर, वरंध विभाग शिवसेनेचे सुभाष मालुसरे आदींनी आपदग्रस्त कुटुंबाची महसूल विभागाचे तलाठी घरत यांच्या समवेत पाहणी केली. पंचनामा करून या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली. या घटनेत दोन गाई व वासरे जखमी झाली आहेत. दैव बलवत्तर म्हणून गोठा मालकाच्या घरावर गोठा कोसळला नाही म्हणून मोठी दुर्घटना टळली.