मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांमुळे माणगावमध्ये नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:23 PM2019-12-12T23:23:13+5:302019-12-12T23:24:27+5:30
म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांच्या दशहतीमुळे नागरिकांना हैराण केले आहे.
म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांच्या दशहतीमुळे नागरिकांना हैराण केले आहे. मागील १५ ते २० दिवसांत शहरात श्वानदंशाच्या १० ते १५ घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात व माणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
कुत्र्यांप्रमाणेच शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, पदपथावरील व्यावसायिक, भाजी व फळविक्रेते, वाहतूकदारांना त्रासाचे होत आहे. शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढत असताना नगरपंचायत प्रशासन काय करीत आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत.
मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांमुळे म्हसळावासी हैराण झाले आहेत. गुरांवर मालकांचे व नगरपंचायतीचे नियंत्रण नसल्याने वाहतूककोंडीची समस्याही बळावत आहे. पहाटे अथवा रात्री उशिरा येणारे पादचारी, दुचाकीवाहनांच्या मागे कुत्रे लागत असल्याचे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
नगरपंचायतीकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, तसेच मोकाट गुरांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात यत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांत श्वानदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना खेळताना, तसेच ज्येष्ठ नागरिक भययुक्त वातावरणात फिरताना दिसतात.अनेक वेळा शहरांत मोकाट गुरामुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. याशिवाय अपघातचे प्रसंगही ओढावले आहेत. अखेर वाहतूक पोलिसांना गुरे हाकलावी लागतात. गुरे नियंत्रण हा विषय प्राधान्याने नगरपंचायतीचा असल्याचे वाहतूक पोलिसांनी या वेळी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी मासिक सभेत मोकाट गुरांच्या विषयी चर्चा झाली होती. सर्व अधिकार सीईओ, नगरपंचायत यांना देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून याबाबत योग्य उपाययोजना अपेक्षित आहेत.
- नासीर दळवी, माजी उपमहापौर, म्हसळा.
मोकाट गुरे व कुत्रे हा म्हसळ्यातील प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून दहशतीत वावरत आहेत. मासिक सभेपुढे हा प्रश्न घेण्यात येणार आहे.
- दीपाली मुंडये, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत, म्हसळा
मोकाट गुरे खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या जागी अतिक्रमण, नासाडी करीत असल्यास त्यांना कोंडवाड्यांत घालणे, ही जबाबदारी नगरपालिका अधिकारी किंवा मुख्य अधिकाऱ्यांची आहे.
- जहूर हुर्जुक, सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा