बोर्ली-मांडला : मुंबई-गोवा महामार्गावर पुगांव नजीक रोहा वनविभागाच्या वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने बेकायदेशीर विनापरवाना बिनदिक्कतपणे खैर सोलिव लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो मुद्दे मालासह पकडून वाहनचालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर विनापरवाना बेकायदेशीर खैर सोलिव लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती रोहा वनविभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाला लागली होती. या पथकाने सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावर पुगांव येथे एम.एच.-०४ डी.के.२३८८ क्रमांकाचा टेम्पो पकडला. या वाहनामध्ये वाहतूक होत असलेला खैर सोलिव नग ४०६ व टेम्पो असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. शमसुल हसन खान (वाहनचालक, रा.माहीम पूर्व), जावेद शेख (मालक, रा.डहाणू रोड, पालघर) तय्यब अशा तीन जणांवर भारतीय वनविभाग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वनविभाग संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहाचे इच्छात कांबळी, फिरते पथक वनरक्षक आर. जी. पाटील, भगत, देवकांबळे, मुळे, वनपाल मंगेश शेळके हे करीत आहेत. या कामी तपासणी नाका वनरक्षक पव्हेरे, राजमाने व वाहनचालक लोखंडे यांचे सहकार्य लाभले.