इंटरनेट आर्थिक व्यवहार करताना खबरदारी आवश्यक, वर्षभरात 44 सायबर गुन्ह्यात 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 04:45 PM2018-01-23T16:45:30+5:302018-01-23T16:45:45+5:30
इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर विश्वातील आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले.
- जयंत धुळप
रायगड - इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर विश्वातील आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले.
‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा पोलीस व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी पारसकर बोलत होते.
यावेळी अपर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी, रायगड पोलीस जनसंपर्क अधिकारी पोलीस निरिक्षक आर.एन.राजे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
पारस्कर पूढे म्हणाले, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे हे बहूतांश आर्थिक गुन्हे असतात शिवाय सोशल मिडियात वावरतांना आपल्या वर्तनाने समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही. याची दक्षता घेणो आवश्यक असल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात गतवर्षभरात सायबर क्राईम अंतर्गत एकूण 44 गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये एकुण 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यापैकी 7 गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. या सात गुन्ह्यांथी निगडीत रक्कम 31 लाख 18 हजार 609 रुपये आहे. अन्य पाच गुन्ह्याचा देखील तपास पूर्ण झाला असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील या 44 सायबर क्राईम पैकी 23 गुन्हे बॅन्क एटीएमशी संबंधीत आहेत. दरम्यान विविध बॅन्कांच्या एटीएम केबिन मध्ये एकापेक्षा अधिक एटीएम मशिन्स असणो वा एटीएम मशीन व खात्यात पैसे भरण्याचे मशीन असणो अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. एकावेळी केबिन मध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींनी असणो हे गुन्ह्याला निमंत्रण देणारे ठरु शकते. ही परिस्थिती बदलण्याकरीता सर्व बॅंकांना याबाबत तत्काळ कळविण्यात येईल असे स्वामी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कार्यशाळेत सायबर सुरक्षा, सिटीझन पोर्टल, मोबाईल अॅप विषयक माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.