महामार्गावर १६ ठिकाणी सीसीटीव्ही, गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:32 AM2020-08-21T01:32:33+5:302020-08-21T01:32:40+5:30
या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
निखिल म्हात्रे
अलिबाग : गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या चाकरमानी कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक चाकरमानी हे कोकणातील आपल्या घरी जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे १४५ किलोमीटरच्या मार्गावर २१७ पोलीस कर्मचारी आणि २५ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तर मुंबई-गोवा हायवेवरील रहदारीची महत्त्वाची ठिकाणे असलेल्या खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळसमवेत महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अॅम्ब्युलन्स आणि क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईसह इतर ठिकाणांहून प्रवास करणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या बाजारपेठांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत पेण तालुक्यातील पेण - खोपोली बायपास ४, रामवाडी चौकी ३, वडखळ ३ असे पेण तालुक्यात
१०, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्डवर १, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात ३, विसावा हॉटेल परिसरात १ तर पाली येथे ४ अशा एकूण १६ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
>रायगडमधील नियोजन
सीसीटीव्ही १६
पोलीस उपविभागीय अधिकारी 0६
पोलीस निरीक्षक 0६
साहाय्यक पोलीस निरीक्षक/
साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक १३
वाहतूक पोलीस कर्मचारी,
पोलीस कर्मचारी २१७
मदत केंद्रे 0९
वॉकीटॉकी २०
क्रेन 0९
रु ग्णवाहिका 0९
>रायगड जिल्ह्यात २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. १ लाख २३९ खाजगी गणपती आहेत तर १३ हजार ३७२ ठिकाणी गौरी स्थापना होते. या काळात होम गार्ड्स व राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार आहे.