वाहतूक नियंत्रणासाठी गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर १८ ठिकाणी सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:24 AM2017-08-23T03:24:36+5:302017-08-23T03:24:40+5:30
गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या वाहतूककोंडीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलिसांनी महत्त्वाच्या १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
अलिबाग : गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या वाहतूककोंडीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलिसांनी महत्त्वाच्या १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गणेशभक्तांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी सुमारे ४०० पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक चाकरमानी हे कोकणात येतात. या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे १४५ किलोमीटरच्या मार्गावर ४०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याच मार्गावर १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना चांगलीच मदत होणार आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळ यासारख्या वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अॅम्ब्युलन्स आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील हमरापूर फाट्यावरील मदत केंद्रात २ सीसीटीव्ही, पेण - खोपोली बायपास ३, रामवाडी चौकी २ असे पेण तालुक्यात ७, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्डवर ३, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात ३, विसावा हॉटेल परिसरात २ तर, पाली ३ असे एकूण १८ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
- जिल्ह्यात एकूण २७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, तर ९८ हजार ६७० खासगी गणपतींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तसेच १३ हजार ३७२ ठिकाणी गौरींची स्थापना होणार आहे. गणेशोत्सव काळासाठी जिल्ह्यातील पोलीस बळाव्यतिरिक्त होमगाडर््स, राज्य राखीव दलाची मदतही घेतली जाणार आहे.
- राष्टÑीय महामार्ग वाहतूक पोलीस कार्यालय ठाणे यांचेअंतर्गत पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हात खांबा, कसाल असे आठ वाहतूक शाखा कार्यालय आहे. पळस्पे ते कसाल याचे ४७५ किमीचे अंतर असून या आठ कार्यालयांतर्गत येणाºया मुख्य महामार्गाच्या ठिकाणी अधिकारी तसेच कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे.
पळस्पे ते कोकणाच्या तळापर्यंत २२ आॅगस्टपासून ५५४ कर्मचारी तर ४० अधिकारी तैनात आहेत. हे सर्व कर्मचारी महामार्गावर थांबून कोकणात जाणाºया सर्व चाकरमान्यांच्या वाहनांना येणारे अडथळे दूर करण्याचे काम करणार आहेत. त्यामुळे गणपती सणानिमित्त चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होणार आहे.